सातारा / प्रतिनिधी :
अगोदरच पावसाने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या 49 बंधाऱ्यांना झळ पोहचली असून, जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच 2021-22 या वर्षात नव्याने बांधण्यात येणाऱ्या लघु पाटबंधारेच्या बंधाऱ्यांची टेंडर प्रक्रिया सहा दिवसांची ठेवली आहे. वास्तविक टेंडर प्रक्रिया 21 दिवसांची असते. यामुळे बदली होऊन आलेले अभियंता ओतारी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यामागे तक्रारी सुरु झाल्या आहेत. लघु पाटबंधारे विभागाने कमी मुदतीत बोलवलेल्या टेंडर प्रकियेमध्ये गोलमाल असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे तक्रारी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 56 बंधाऱ्यांच्या कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे कामकाज सुरु आहे. त्यामध्ये माण तालुक्यातील दानवलेवाडी, आंधळी, वडगाव कोळेकरवाडी, दिवड, मोगराळे, जाशी, मोही, कराड तालुक्यातील तळबीड, जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ, रायगाव, फलटण तालुक्यातील सासकल, हिंगणगाव, आदर्की, तांबवे, वाठार निंबाळकर, शेरेचीवाडी, खटाव तालुक्यातील कलेढोण, विसापुर, वाकेश्वर, पिंपरी, दरुज, बुध, कान्हरवाडी, पाटण तालुक्यातील केळेवाडी, पाडळोशी, चिंचेवाडी, कंळबे, महाबळवाडी, मानेगाव, तामकणे, गारवडे, सातारा तालुक्यातील वणगळ, फत्यापूर, मांडवे, सांडवली, कोडोली, निगडी, वर्ये, कोरेगाव तालुक्यातील न्हावी, नलवडेवाडी, वाई तालुक्यातील भुईंज, शहाबाग, खंडाळा तालुक्यातील झगलवाडी, अंदोरी, खेड बुद्रुक, धनगरवाडी, कराड तालुक्यातील ओंड, काले, कळंत्रेवाडी, कामथी, डेळेवाडी, कार्वे आदी 56 ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी ठेकेदारांच्या दि.16 जुलै ते 22 जुलै या दरम्यान आपल्या निविदा सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मागवण्यात आल्या.
18 लाखांच्या कामाकरता 21 दिवसांची मुदत असेते. येथे केवळ सहा दिवसांची मुदत दिली गेली आहे. दि.26 ला ही प्रक्रिया बंदही करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता असून, त्याबाबत तक्रारही झाली आहे. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी ही प्रक्रिया पुन्हा बोलवण्यात यावी, अशी लेखी तक्रार केली आहे.









