बँकेचे 2 लाख 36 हजार थकवले : परवानगी न घेता साठेखत दस्त रद्द केला
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील बंधन बँकेतून 2017 सालात फ्लॅट खरेदीसाठी साठेखताचा आधार दाखवून 11 लाख 40 हजारांचे कर्ज घेतले. मात्र त्याचे काही हप्ते भरल्यानंतर पुढील हप्ते भरलेच नाहीत. कर्जाची एकूण रक्कम 13 लाख 76 हजार रुपये झाली. त्याबाबत बँकेने वसुली प्रक्रिया सुरु केल्यावर बिल्डरने 11 लाख 40 हजार बँकेत भरले. मात्र उर्वरित 2 लाख 36 न भरता बँकेकडे तारण असलेला साठेखताचा दस्त परस्पर रद्द करुन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बँकेचे एरिया इन्चार्ज निशीकांत दिलीप संकपाळ यांनी तक्रार दिली आहे. दि. 9 ऑक्टोबर 2017 मध्ये विक्रांत बाळकृष्ण दुबळे, शशिकला बाळकृष्ण दुबळे (दोघे रा. चिपळूणकर बागेजवळ, मंगळवार पेठ, सातारा) यांनी आर्या डेव्हलपर्सचे मालक दिग्विजय आनंदराव गायकवाड व विद्या दिग्विजय गायकवाड दोघे (रा. कुलाबा पोलीस क्वार्टर, मुंबई) यांच्यासमवेत केलेले साठे करारपत्र दस्त बँकेकडे तारण ठेवून 11 लाख 40 हजारांचे कर्ज घेतले. ते बिल्डर गायकवाड यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले होते.
पहिले पाच महिने दुबळे दांपत्याने त्याचे हप्ते भरले. मात्र 2018 मध्ये त्यांचे हप्ते बंद झाले. त्यांना विचारणा केल्यावर त्यांचा व्यवसाय अडचणीत आल्याने ते हप्ते भरु शकणार नाहीत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मिळकतीवर कायदेशीर ताबा घेण्यासाठी तक्रारदार वृंदावन गृह प्रकल्पावर गेले असताना बिल्डर दिग्विजय गायकवाड व त्यांचा सहकारी सुभाष मदने यांनी तक्रारदारास मारहाण करण्याचच धमकी दिली.
यानंतर बँकेने कायदेशीर वसुली प्रक्रिया सुरु केली. तोपर्यंत कर्जाची रक्कम 13 लाख 76 हजार रुपये झाली होती. त्यापैकी 11 लाख 40 हजार रुपये बिल्डर गायकवाड यांनी बंधन बँकेत जमा केले. मात्र फ्लॅटधारक दुबळे दांपत्य व बिल्डर गायकवाड दांपत्याने बंधन बँकेची कोणतीही परवानगी न घेता साठेखत दस्त परस्पर रद्द केला तसेच उर्वरित 2 लाख 36 हजार रुपये रक्कम न भरता बँकेची फसवणूक केल्याची तक्रार संकपाळ यांनी दिलीय. याबाबत फ्लॅटधारक दुबळे यांच्यासह बिल्डर गायकवाड दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









