प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हिरवे फटाके वगळता सामान्य फटाक्यांवर बंदी घातली आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री होत असल्याने बेंगळूरसह राज्यभरात पोलिसांनी छापे टाकून फटाके जप्त केले आहेत. बेंगळूर, दावणगेरे, म्हैसूर व इतरत्र कारवाई करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त काही फटाके दुकानदारांनी महिनाभरापूर्वीच फटाक्यांचा साठा केला आहे. मात्र, राज्य सरकारने हिरवे फटाके वगळता इतर फटक्यांवर अलिकडेच बंदी घातली. शिवाय सरकारच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. तरी सुद्धा काही विक्रेत्यांकडून सामान्य फटाक्यांची विक्री होत असल्याचे आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी शुक्रवारपासूनच बंदी असणाऱया फटाक्यांची विक्री होत असलेल्या दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत. कारवाईप्रसंगी अनेक ठिकाणी दुकानदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या. अवैधपणे फटाके विक्री करणाऱयांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
म्हैसूरमध्ये जी. के. मैदानावर फटाके विक्री होणाऱया गाळय़ांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामान्य फटाक्यांची विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आले. म्हैसूर शहर पोलीस आयुक्त
डॉ. चंद्रगुप्त यांनी देखील तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी फटाके विक्रेत्यांनी सरकारच्या आदेशाबद्दल गोंधळ आहे. त्यामुळे यंदा तरी सर्व प्रकारचे फटाके विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, पोलीस आयुक्तांनी सरकारने परवानाधारकांनाच केवळ ट्रेडमार्क असणारे हिरवे फटाके विक्रीसाठी मुभा दिली आहे. संबंधित प्राधिकरणाकडून परवाना घेतल्याशिवाय फटाक्यांची विक्री करता येणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.









