रविवारी उशिरापर्यंत 8 आकडा गाठण्यात अपयश : लोबो, कामतांवर पक्ष न सोडताही कारवाईची विसंगती
प्रतिनिधी /पणजी
पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकाविणाऱया काँग्रेस नेत्यांना दोन तृतियांश बहुमतासाठीची जमवाजमव व अन्य जुळवाजुळव करणे रविवारी रात्री उशिरापर्यंत शक्य झाले नसल्याने बंड पुरते फसल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आम्ही पक्षातच आहोत, असे सांगत भाजपकडे संबंध असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. तथापि, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत काँग्रेस ठाम असल्याने काल सोमवारी काँग्रेसच्या 6 आमदारांनी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत सभापती रमेश तवडकर यांची भेट घेऊन काँग्रेस विधीमंडळ नेते पदावरुन मायकल लोबो यांना कमी केले आहे, त्यामुळे त्यांच्याकडील विरोधी पक्षनेते पद काढून घ्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, दिगंबर कामत यांनी काँग्रेस नेते दिनेश गुंडूराव यांच्या विधानाने आपण फार दुखवलेलो आहे, असे म्हटले आहे.
काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये जाण्याची तयारी करीत असताना अचानक दोन आमदारांनी पलटी खाल्यानंतर आणि भाजपने फार मोठा रस दाखविला नसल्याने काँग्रेस आमदारांचे बंड फसले. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील आठजण रविवारी बंड करणार होते. रात्री उशिरापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. दिनेश गुंडूराव यांनी मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेस विधीमंडळ बैठक बोलाविली असता बंडखोर गटाने बहिष्कार घातल्याने संतप्त दिनेश गुंडूराव यांनी दिगंबर कामत आणि मायकल लोबो या दोघांनीच पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा जोरदार आरोप केला होता.
लोबोंना गटनेतेपदावरुन हटविले
काँग्रेसमधून फुटण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्याकडे पुरेसे 8 जणांचे संख्याबळ जमले नसल्याने त्यांच्याच विरोधात कारवाई करण्याचे काँग्रेसने ठरविले आणि दिनेश गुंडूराव यांनी रात्रीच बोलाविल्या काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत मायकल लोबो यांचे विधीमंडळ गट नेतेपद काढून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
लोबोंकडील विरोधी पक्षनेतेपद काढावे
काल सोमवारी सकाळी राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी युरी आलेमाव, संकल्प आमोणकर, एल्टन डिकॉस्टा यांच्यासह 6 जणांनी सभापतींची भेट घेतली. मायकल लोबो यांना काँग्रेस नेतेपदावरुन हटविण्यात आल्याची लेखी माहिती सभापतींना दिली. त्यांना विरोधी पक्षनेते पदावरुन हटविण्याचीही मागणी केली.
जणू काही काहीच झालेच नाही
सकाळी विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच विरोधी पक्षनेते मायकल लोबोसह काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात हजर राहिले. आजारपणामुळे आलेक्स सिक्वेरा गैरहजर होते. सभागृहात मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष या नात्याने कामकाज चालले. मायकल लोबो यांच्याकडे नेता या दृष्टीकोनातून काँग्रेस आमदारांनी पाहिले नाही. तथापि, रविवारी सकाळपासून मध्यरात्री उशिरापर्यंत ज्या काही घडामोडी गेल्या 24 तासांत झाल्या त्याचा सभागृहावर वा काँग्रेसच्या कामकाजावर कोणताही परिणाम नव्हता. नेहमीच्याच अविर्भावात मायकल लोबो यांची भाषणे सभागृहात झाली.
आपण दुखावला गेलो : दिगंबर
विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना पत्रकारांनी अडविले व त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की आपण काँग्रेस पक्षात अगोदरच जखमी खेळाडू आहे. त्यातच दिनेश गुंडूराव यांनी जे आपल्यावर वारेमाप आरोप केले त्यातून आपण फार दुखावलो गेलो. आपण यामुळे अत्यंत दुःखी झालो आहे. आपण काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. आपल्यावर अकारण गंभीर आरोप करण्यात आल्याचेही दिगंबर कामत म्हणाले.
विधीमंडळ नेतेपदावरुन मुक्त करा : मायकल
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आपण काँग्रेस पक्षातच आहे. आपण भाजपच्या संपर्कात आहे अशा पद्धतीचे जे आरोप झाले ते सारे बकवास आहेत. आपली पत्नी मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेली होती. ती आमदार आहे, तिने मुख्यमंत्र्यांकडे जाऊ नये काय? असा उलट सवाल लोबो यांनी केला. आपण यापूर्वीच पक्षाला सांगितले होते की, आपल्याला विधीमंडळ नेतेपदावरुन मुक्त करा. आपण आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला त्यातून मुक्त करा अशी मागणी केली होती, असे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.
पक्षात फूट नाही : संकल्प, आलेक्स
काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेसचे अकराही आमदार काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष गोव्यातून संपवू पाहात आहे. आमच्या नेत्यांना पक्षाच्या जाळ्य़ात ओढण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. परंतु त्यात त्यांना अपयश आले. पक्षाचे सर्व आमदार संघटीत आहेत, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकूल वासनिक यांना पक्षश्रेष्ठींनी सोमवारी गोव्यात पाठविले आहे. ते दुपारी गोव्यात आले. आमदार आलेक्स सिक्वेरा व माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. त्यामुळे कोणतेही पक्षांतरही झालेले नाही. पक्षाने मायकल लोबो यांचे विधीमंडळ नेतेपद काढून घेतलेले आहे व दिगंबर कामत यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही, असे आलेक्स सिक्वेरा म्हणाले.
काँग्रेस पक्षातील विसंगती उघड
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोघांनाही अपात्र करण्यात यावे यासाठीची एक याचिका सादर केली आहे. या याचिकेवर विचारविनिमय करण्यासाठी सभापतींनी काँग्रेस नेत्यांना आज मंगळवारी बोलाविले आहे. पक्षांतर्गत आमदारांनी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी पक्ष सोडलेला नाही वा पक्षात फूट पडलेली नाही असे सांगितले असले तरीही पक्षाने दोन्ही नेत्यांविरोधात याचिका सादर केली आहे. काँग्रेस पक्षातील विसंगती यामुळे उघड झाली आहे.

काँग्रेसमध्ये मी अगोदरच जखमी खेळाडू. त्यातच दिनेश गुंडूराव यांनी आपल्यावर वारेमाप आरोप केले त्यातून आपण फार दुखावलो, अत्यंत दुःखी झालो आहे.
दिगंबर कामत, आमदार काँग्रेस

आपण आवश्यक तेवढी वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे आपल्याला विधीमंडळ नेतेपदावरुन मुक्त करा, अशी मागणी आपण या अगोदरच, खूप पूर्वीच केली होती.
मायकल लोबो, विरोधी पक्षनेता

काँग्रेसचे अकराही आमदार काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष गोव्यातून संपवू पाहात आहे.
संकल्प आमोणकर, आमदार काँग्रेस

काँग्रेसमधून पक्षांतर झालेले नाही. पक्षाने मायकल लोबो यांचे विधीमंडळ नेतेपद काढून घेतले आहे. दिगंबर कामत यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही.
आलेक्स सिक्वेरा, आमदार काँग्रेस









