ऑनलाईन टीम / सातारा :
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात साताऱ्यात आंदोलन करताना दारु आणि राजकीय नेत्यांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ह.भ.प. बडातात्या कराडकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि त्याचे पुरावे देखील आपल्याकडं असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या मुलांचाही उल्लेख केला होता. तसेच पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसं झालं ते ही मला सांगाव, असे त्यांनी पत्रकारांना विचारले.
बंडातात्या यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध व्यक्त होत असून, राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आज सातारा पोलिसांनी फलटणच्या पिंप्रदमधून बंडातात्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.