वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सोमवारी झालेल्या 75 व्या सामन्यात विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा 41-22 अशा गुणांनी पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात पुणेरी पलटणने दबंग दिल्लीवर 42-25 अशा गुणांनी मात केली.
बंगाल आणि जयपूर यांच्यातील सामन्यात बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगने दर्जेदार कामगिरी करताना 13 गुण मिळविले. या विजयामुळे बंगाल वॉरियर्सला प्लेऑफ गटात प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात जयपूर संघातर्फे अर्जुन देसवालने 10 गुण मिळविले. बंगाल संघातील सिंगने 4 गुण तसेच विशाल मानेने 2 गुण नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत बंगाल संघाने 14-11 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या पहिल्याच मिनिटाला जयपूर संघाचे सर्व गडी बाद झाले. बंगाल संघाने उत्तरार्धातील खेळाच्या सातव्या मिनिटाला जयपूर संघाचे दुसऱयांदा सर्वगडी बाद करून 27-14 अशी भक्कम आघाडी घेतली. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना सहुल कुमार आणि संदीप धुल यांना बचावफळीमध्ये चांगल्या कामगिरीसाठी झगडावे लागत असताना मोहम्मद नबीबक्षने जयपूर संघाचे तिसऱयांदा सर्वगडी बाद करून बंगाल वॉरियर्सला 20 गुणांची आघाडी मिळवून दिली. जयपूर संघातील अर्जुन देसवालने सुपर 10 गुण मिळवूनही बंगाल वॉरियर्सला विजयापासून रोखता आले नाही. बंगाल वॉरियर्सने हा सामना 19 गुणांच्या फरकाने जिंकत जयपूर संघाचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या 76 सामन्यात पुणेरी पलटणने दबंग दिल्लीचा 42-25 अशा 17 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात पुणेरी पलटणच्या बचावफळीची कामगिरी महत्त्वाची ठरली. पुणे संघातील मोहित गोयतने एक टॅकल गुणांसह एकूण 10 गुण तर सोमवीरने 6 गुण नोंदविले. या सामन्यात दबंग दिल्लीला नवीन कुमार आणि अनुभवी नरवाल यांची उणीव भासली. पूर्वार्धात पुणेरी पलटणने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपले वर्चस्व राखले होते. अस्लम इनामदार, गोयत आणि नितीन तोमर यांनी पुणे संघाला झटपट गुण मिळवून दिले. मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटणने दबंग दिल्लीवर 25-13 अशी आघाडी घेतली होती. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना पुणे संघाने तिसऱयांदा दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद केले आणि 19 गुणांची आघाडी मिळविली. अखेर पुणेरी पलटणने हा सामना 17 गुणांच्या फरकाने जिंकून दबंग दिल्लीचे आव्हान संपुष्टात आणले.









