काँग्रेसचा आक्षेप तरीही तृणमूलचा प्रचार करणार तेजस्वी
पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रभाव बिहारच्या राजकारणावरही दिसून येत आहे. विशेषकरून महाआघाडीत सामील दोन मोठे पक्ष राजद आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत तृणमूलसाठी बंगालमध्ये निवडणूक प्रचाराची तयारी चालविली आहे. त्यांना केवळ तृणमूलच्या औपचारिक निमंत्रणाची प्रतीक्षा आहे. तेजस्वी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मार्च महिन्यात कोलकाता येथे भेट घेतली होती, ज्यानंतर राजदने तृणमूलला विनाशर्त पाठिंबा दिला होता.
काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी 17 मार्च रोजी तेजस्वी यांना पत्र लिहिले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे, अशा स्थितीत स्टार प्रचारक म्हणून तेजस्वी यांचे तृणमूलच्या समर्थनार्थ उभे राहणे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणारे ठरणार असल्याचे भट्टाचार्य यांनी पत्रात नमूद पेले आहे. तरीही तेजस्वी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या अखेरच्या तीन टप्प्यांदरम्यान तृणमूलसाठी प्रचार करणार आहेत.
बंगाल निवडणुकीतील तेजस्वी यांच्या प्रचारावरून तृणमूलच्या अनेक उमेदवारांनी विनंती केली आहे. तृणमूलकडून कार्यक्रमांची औपचारिक यादी पाठविण्यात आल्यावर तेजस्वी यादव यांच्या प्रचारमोहिमेला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
बिहारच्या लोकांचे प्रमाण अधिक असलेल्या मतदारसंघांमध्येच तेजस्वी प्रचार करणार आहेत. अशा मतदारसंघांमध्ये 22, 26 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 17 एप्रिलनंतर तेजस्वी पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी दाखल होतील.