ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजयी हॅट्रीक केली आहे. भाजपने जोर लावलेल्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेस 216 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष लागलेल्या नंदीग्राममधून ममता यांना नाट्यमय रित्या पराभूत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांनी या निकालावर आक्षेप नोंदवला आहे.
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साधला आहे.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात येत होते. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी पराभव केल्याचे सांगण्यात आले. परंतु, यानंतर घुमजाव करत ममता बॅनर्जी यांना पराभूत घोषित करण्यात आले. यावर ममता बॅनर्जी यांनीही आक्षेप घेतला आहे. मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.









