आघाडी करूनही पदरी शून्य – तृणमूलच्या लाटेत दोन्ही पक्ष अस्तित्वहीन
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळविला आहे. तृणमूलने मुख्य विरोधी पक्ष भाजपच्या तुलनेत सुमारे 10 टक्के अधिक मते मिळविली आहेत. तृणमूलला सुमारे 48 तर भाजपला 38 टक्के मते प्राप्त झाली आहेत. मागील निवडणुकीत 44 जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला यंदा खातेही उघडता आलेले नाही.
काँग्रेसला 2.93 टक्के मते मिळाली, पण एकही जागा जिंकता आलेली नाही. हीच स्थितीत डाव्या पक्षांची राहिली आहे. डाव्या पक्षांनी काँग्रेस आणि पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या इंडियन सेक्युलर प्रंटसोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. या आघाडीला भोपळाही फोडता आलेला नाही. राज्याच्या सत्तेवर दीर्घकाळ राहिलेले हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन देखील बंगालच्या जनतेने त्यांना नाकारले आहे.
बंगालच्या 292 पैकी 213 जागांवर तृणमूलने विजय मिळविला आहे. बंगालमध्ये स्वतःचे राजकीय अस्तित्व विस्तारू पाहत असलेल्या भाजपला 77 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रीय सेक्युलर पार्टीचा एक तर एक अपक्ष उमेदवारही विजयी होत विधानसभेत पोहोचला आहे. पण काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा एक देखील उमेदवार विजयी होऊ शकलेला नाही.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंगालच्या विधानसभेत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा एकही आमदार नसेल. मागील निवडणुकीत काँग्रेसने 44 तर माकपने 26 जागांवर विजय मिळविला होता. 2011 च्या निवडणुकीत डाव्या पक्षांच्या दीर्घ शासनकाळाचा अंत झाला होता, तेव्हाही काँग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या. 1977 ते 2006 च्या निवडणुकीपर्यंत डाव्या पक्षांचे सरकार सत्ता राखत होते. तेव्हा देखील काँग्रेस विधानसभेत शून्यावर पोहोचला नव्हता.