तृणमूल सत्तेवरून पायउतार होणार – भाजपचे सरकार येणार
वृत्तसंस्था/ .कोलकाता
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी शनिवारी संध्याकाळी नदिया जिल्हय़ाच्या नवद्वीपमध्ये ‘परिवर्तन यात्रे’चा शुभारंभ केला आहे. यापूर्वी तेथे आयोजित सभेत त्यांनी तृणमूल अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. ममतांनी बंगालच्या 70 लाख शेतकऱयांना सन्माननिधी योजनेपासून वंचित ठेवले. ममता बॅनर्जी राज्यात आता ही योजना लागू करू पाहत आहेत, पण आता पश्चाताप करून काहीच होणार नाही. बंगालमध्ये आता परिवर्तन घडणार असून तृणमूल सत्तेवरून पायउतार होणार आहे, तर भाजप सत्तेवर येणे निश्चित असल्याचा दावा नड्डा यांनी केला आहे.
ममतांनी ‘माटी मानुष’ची शपथ घेत 10 वर्षांपूर्वी सरकार स्थापन केले होते. 10 वर्षांमध्ये ‘मां’ला लुटण्यात आले, ‘माटी’चा अनादर करण्यात आला आणि ‘मानुष’चे रक्षण करण्यात आले नसल्याचा आरोप नड्डा यांनी केला आहे.
जनतेत जागृती करू
राज्यात टोलाबाजी (भ्रष्टाचार), तुष्टीकरण आणि हुकुमशाही विराजमान राहिली आहे. याचमुळे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून बंगालच्या जनतेला जागृत करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बंगालमध्ये परिवर्तनाची वेळ आली असून येथेही सुशासन येणार आहे. ममता सरकारने राज्यात भ्रष्टाचाराचे संस्थात्मक स्वरुप दिले आहे. प्रशासनाचे राजकीयकरण केला असून पोलिसांचा वापर गुन्हेगारीला बळ देण्यासाठी केला जात आहे. हे सर्व गैरप्रकार रोखण्यात येणार असल्याचे नड्डा म्हणाले.
बंगालची संस्कृती सांभाळण्यास अपयश
पश्चिम बंगालच्या संस्कृतीला ममता बॅनर्जी सांभाळू शकत नाहीत. याची सुरक्षा भाजपचे कार्यकर्ते करतील. देशभरात महिलांवर सर्वाधिक अत्याचार बंगालमध्ये होतो. बलात्कार तसेच घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना याच राज्यात घडतात. येथे मुख्यमंत्री महिला असूनही महिलांचा सन्मान होत नसल्यास राज्यात परिवर्तनाची गरज असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
ममतांना राग का येतो?
जेव्हा आम्ही बोलतो, तेव्हा उपस्थित जनसमुदायातून जय श्रीराम अशा घोषणा दिल्या जातात. येथे असताना हेलिपॅडपासून सर्व वाटेत लोकांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. ममतादीदींना जय श्रीरामचा इतका का राग येतो असे म्हणत नड्डा यांनी तृणमूल अध्यक्षांना लक्ष्य केले आहे.
माझ्यावर हल्ला, मग सामान्यांचे काय
ममतांचे सरकार विकासाच्या मार्गात अडथळा ठरत आहे. हे सरकार गेल्यावरच बंगालचा विकास होणार आहे. ममतांच्या शासनकाळात माझ्यावर हल्ला होऊ शकतो मग सर्वसामान्यांची स्थिती काय असेल हे चांगल्याप्रकारे जाणून घेता येते अशी टिप्पणी भाजप अध्यक्षांनी केली आहे.









