उत्तर कर्नाटकाला ऑरेंज अलर्टचा इशारा
प्रतिनिधी / पुणे
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे वादळात रुपांतर झाले असून हे वादळ आज मंगळवारी आंधप्रदेशाच्या किनारपटीला धडकण्याची शक्यता आहे. तसेच वाऱयाचा वेग ताशी 65 ते 75 किमी एवढा असेल, असा इशारा हवामान विभागाने सोमवारी येथे दिला.
कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तेलंगणात येत्या 24 तासांत अतिवृष्टी, तर ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, विदर्भ, केरळच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम-उत्तर पश्चिम म्हणजेच मध्य भारताच्या दिशेने राहणार असल्याने मंगळवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर कर्नाटकच्या भागात ऑरेंज अलर्टचा (मुसळधार पावसाचा) इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तीन दिवस पाऊस
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण सक्रिय झाल्याने राज्यात पुन्हा जोरदार पावसास सुरुवात झाली आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस कायम राहणार असून, मंगळवारपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मुसळधार, तर बुधवारी मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज आहे, तर कोकण-गोवा मराठवाडय़ात मुसळधार, विदर्भात जोरदार पाऊस राहील.