दोन दिवसांत होणार निर्मिती
पुणे / प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात येत्या 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्यानंतर त्याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हे चक्रीवादळ पुढे बांग्लादेश व म्यानमारच्या किनारपट्टीला धडकणार असून, याच्या प्रभावामुळे 1 ते 3 मेच्यादरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. याशिवाय पूर्व किनारपट्टीतील राज्ये, दक्षिण भारत, महाराष्ट्र, पूर्वोत्तर भारत तसेच उत्तरेकडील अनेक राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण अंदमान समुद्राच्या आसपास सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. याच्या प्रभावामुळे दक्षिण भारत तसेच अन्यत्र पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांत या कमी दाबाची क्षेत्रता वाढणार असून, त्याचे ‘अंफन’ या चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ उत्तर-पश्चिमेच्या दिशेने सरकत बांग्लादेश ते म्यानमारच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चक्रीवादळांच्या नावांची नवीन यादी तयार अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱया चक्रीवादळांच्या नावाची नवीन यादी भारतीय हवामान विभागाने जाहीर केली आहे. एकूण 13 देशांकडून प्रत्येकी 13 अशा 169 नावांचा समावेश यात आहे. पुढील हंगामापासून या नवीन यादीतील नावे वापरण्यास सुरुवात होईल. यापूर्वी 2004 ला नावांची पहिली यादी तयार करण्यात आली होती. ती यादी संपत आली असून, अंफन हे त्यातील शेवटचे नाव आहे. भारताने नव्या यादीत गती, तेज, आग, व्योम, झोर, नीर, प्रभंजन, अंबुड, जलाधी, वेग आदी नावे दिली आहेत.









