प्रतिनिधी / उचगांव
कोरोनाच्या महामारीमध्ये कोल्हापुरच्या युवकाने बंगळूरमध्येही आपल्या मदतीचा वारसा सुरु ठेवून दररोज सुमारे ८० ते १०० गरजूंना अन्नाचे पॅकेट देण्याचे काम तो करत आहे. अनिकेत शिरीष नाईक असे त्या युवकाचे नाव आहे. कोल्हापुरातील केआयटीच्या आयएमईआऱमधून बीबीए पूर्ण केल्यानंतर एमएस पूर्ण करण्यासाठी तो इंग्लंडला गेला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिकेतने दुबई आणि इतर देशांमध्ये एअरलाईन्स कंपन्यांमध्ये काम केले. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो घोडावत उद्योगसमूहाच्या स्टार एअरवेजमध्ये सिनिअर केबिन क्रू या पदावर तो रुजू झाला. बंगळूरला जाऊन त्याने नोकरीला सुरुवातही केली.
परंतु कोरोनाच्या महामारीमुळे सर्व एअरलाईन्स बंद झाल्या. अनिकेत बंगळूरमध्येच अडकला. तेथे असताना रस्त्यावर आणि आजूबाजूला असणारे निराधार आणि गरजू लोकांसाठी मदत करायचे त्याने ठरविले. आपल्याकडे असणाऱ्या रकमेतून त्याने धान्य विकत आणले आणि स्वतः दररोज पुलाव भात, आमटी असे अन्नपदार्थ तयार करुन त्याचे पॅकेजिंग करुन रस्त्यावरील निराधारांना तो देऊ लागला. २६ मार्चपासून आजअखेर दररोज ८० ते १०० लोकांना कधी अन्नपदार्थ कधी फळे अशा स्वरुपात मदत करुन कोल्हापूरच्या दातृत्वाचा वारसा त्याने बंगळूरमध्येही कायम ठेवला आहे.