प्रतिनिधी /बेळगाव
बँक कर्मचाऱयांनी खासगीकरणाविरोधात संपाच्या दुसऱया दिवशीही निदर्शने केली. कॅम्प येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी बँक कर्मचाऱयांनी निदर्शने केली. खासगीकरण झाल्यास कर्मचाऱयांवर निर्बंध येणार असून तसे झाल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी असल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले.
केंद्र सरकार खासगीकरणासाठी प्रयत्नशील असल्याने देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारण्यात आला होता. बेळगाव जिल्हय़ातही कर्मचाऱयांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता. बँकांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याने हे तात्काळ थांबवून कायमस्वरुपी कर्मचाऱयांची नेमणूक करण्याची मागणी कर्मचाऱयांनी केली. आंदोलनावेळी कर्मचाऱयांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बेळगाव परिसरातील बँक कर्मचारी सहभागी झाले होते.
एटीएम, ऑनलाईन पेमेंटवर भार बँका या आर्थिक व्यवहाराचा कणा आहेत. बँका दोन दिवस बंद असल्याने सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे ग्राहकांना एटीएम व ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून रहावे लागत होते. यामुळे दोन दिवसांमध्ये ऑनलाईन पेमेंटमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.









