‘चेक क्लिअरन्स’ला सर्वाधिक फटका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वेतन सुधारणासाठी दबाव वाढविण्यासाठी बँक कर्मचारी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवांवर परिणाम झाला. बहुतांश बँकांची ‘शटर डाऊन’ असल्याने रोकड ठेव, पैसे काढणे, चेक क्लिअरन्स आणि कर्ज वितरण या सेवांवर सर्वाधिक परिणाम दिसून आला. तसेच जानेवारी महिन्याच्या वेतन जमा होण्याच्या प्रक्रियेवरही या संपाचा सर्वाधिक परिणाम येत्या दोन-तीन दिवसात दिसून येणार आहे. तसेच शनिवार व रविवार हे पुढील दोन दिवसही बँका बंद राहणार असल्याने एटीएममध्येही रोख रकमेचा तुटवडा जाणवणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार असून बाजारपेठेवरही त्याचा प्रभाव दिसून येईल.
कर्मचाऱयांच्या संपामुळे बँका रविवारसह तीन दिवस बंद राहतील. आता बँका सोमवार, 3 फेब्रुवारीला उघडतील. तथापि, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकांचे व्यवहार सुरू राहिल्याने खातेदारांना थोडाफार दिलासा मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह अनेक बँकांनी ग्राहकांना आगाऊ माहिती दिली होती. तरीही ग्राहकांना याचा फटका बसल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. या संपामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सुमारे 10 लाख कर्मचारी आणि काही खासगी क्षेत्रातील बँक संपात सहभागी झाले होते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा देशाच्या बऱयाच भागात बंद ठेवल्या गेल्या.









