नवी दिल्ली
बँक कर्मचारी संघटनांनी शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. दिल्लीतील मुख्य कामगार आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत युनियन आणि बँकांमधील वादग्रस्त समस्यांवर तोडगा काढण्यात आल्याने हा संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. बँकेमध्ये कर्मचारी काढून टाकणे, बँकांमधील वाढते आऊटसोर्सिंग आणि काही बँकांमध्ये वेतन सुधारणेची अंमलबजावणी करण्यास होणारा विलंब यावरून 19 नोव्हेंबरला बँक संघटना संपावर जाण्याच्या तयारीत होत्या. या संपामध्ये बँक ऑफ बडोदा व पंजाब अँड सिंध बँकेसह विविध बँकांनी ग्राहकांना संप झाल्यास बँक सेवेवर परिणाम होऊ शकतो याची पूर्वकल्पना दिली होती.









