बँक झाली कर्ज देण्यास राजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी समूहाबाबत भारतात सध्या हिंडनबर्गच्या अहवालामुळे चिंता असली तरी बँक ऑफ बडोदाने नुकताच एक दिलासादायी निर्णय जाहीर केला आहे. बँक ऑफ बडोदाचे सीईओ संजीव चढ्ढा यांनी अदानी समूहाबाबत विश्वास व्यक्त करताना अडचणीत असणाऱया अदानी समूहाला आगामी काळात कर्ज देण्यासाठी तयार असल्याचे म्हणत मोठा दिलासा दिला आहे.
अदानी समूहाला झोपडपट्टी पुर्नविकासाच्या प्रकल्पासोबत इतर प्रकल्पांकरीता अतिरीक्त कर्ज देण्यास बँक तयार असल्याचे सीईओ चढ्ढा यांनी म्हटले आहे.
समभागात अनिश्चिततेची चिंता नाही
सध्याला शेअरबाजारात कंपनीच्या विविध समभागांमध्ये चढ-उतार असला तरी त्याची चिंता आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरोपानंतर बँका बॅकफुटवर
हिंडनबर्ग यांच्या अहवालात अदानी समूहावर आरोप लावले गेल्याने विविध बँका कर्ज देण्यास मागे हटत आहेत. या आरोपामुळे अदानी समूहाची संपत्ती कमी होत गेली व समुहातील विविध कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले होते. अशावेळी बँक ऑफ बडोदाने कर्ज देण्याबाबत केलेले सकारात्मक वक्तव्य दिलासा देणारे नक्कीच म्हणता येईल.









