मोबाईल चोरीस जाणे पडले महागात
प्रतिनिधी/ सातारा
मोबाईल चोरीस जाणे हे किती महागात पडू शकते याचा कटू अनुभव सातारा तालुक्यातील कारंडवाडीतील एका दांपत्यास आला असून मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्यांच्या बँक अकाऊंटवरुन प्रारंभी 40 हजार रुपये गेले. त्यानंतर खात्यातील उर्वरित रक्कम वाचावी म्हणून स्टेट बँकेच्या सेवेबाबत गुगलवरुन घेतलेल्या क्रमांकावर पेमेंट स्टॉप करावे म्हणून सांगण्यासाठी फोन केला असता ते देखील त्यांना महाग पडले असून तो क्रमांकही फेक निघाला. तोपर्यंत त्यांच्या खात्यावरुन 6 लाख 65 हजार 63 रुपयांची ऑनलाईन चोरी झाली होती.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात सातारा तालुक्यातील एक महिलेने तक्रार दिली आहे. त्यांचे पती दिल्लीत असून दिल्लीत असतानाच 3 रोजी पतीचा मोबाईल चोरीस गेला. त्यावेळी त्यांनी पतीला दुसऱयाच्या क्रमांकावर फोन करुन बँक अकौंटवरुन पैसे गेलेत का याची खात्री करण्यास सांगितले त्यावेळी दि. 3 रोजी अकाऊंटवरुन वीस, वीस हजार रुपये दोन वेळा काढल्याचे समोर आले.
महिलेने संबंधित प्रकार पतीला सांगितला व बँकेत जावून खाते बंद करण्यास सांगितले. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याने खाते बंद करण्याची प्रक्रिया झाली नाही. बँकेत जाता येत नसल्याने मग महिलेने गुगलवर सर्च केले असता त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अत्यावश्यक सेवा असलेला 99079753593 हा क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर फोन केला असता समोर हिंदी भाषेत बोलणाऱया अनोळखीला हा प्रकार सांगून खाते बंद करायचे असल्याचे सांगितले.
त्यावर अनोळखीने महिलेला एनी डिस्क नावाचा ऍप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर अकांऊटची माहिती विचारुन काही प्रोसेस करण्यास सांगितले. त्या प्रोसेस केल्यानंतर दि. 3 व 4 ऑगस्ट रोजी दांपत्याच्या स्टेट बँकेच्या खात्यातून अनोळखीने 6 लाख 45 हजार ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेत गंडा घातला आहे. पोलिसांनी संबंधित क्रमांकाचा वापर करणाऱया वापर करणाऱया अनोळखी वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.








