सेन्सेक्स 254.57 तर निफ्टी 82.10 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. कालच्या हजार अंकांच्या घसरणीने झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात बाजाराला यश आल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये प्रामुख्याने बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांनी आपली भूमिका सकारात्मक ठेवल्याचा लाभ गुंतवणूकदारांनी घेतल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या समभागातील व्यवहारानंतर दिवसअखेर सेन्सेक्स 254.57 अंकांनी वधारुन निर्देशांक 39,982.98 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.10 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 11,762.45 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समध्ये शुक्रवारी 30 मधील 24 समभाग हे तेजी नेंदवत बंद झाले असून यामध्ये टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक म्हणजे 5.38 टक्क्यांची तेजी राहिली होती. तर निफ्टीमधील जेएसडब्लू स्टीलचे समभाग 6 टक्क्यांनी वधारत बंद झाले आहेत. सोबत टाटा स्टील, बीपीसीएल 5 आणि 4 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बंधन बँक आणि एचडीएफसी बँकेचे समभाग दोन दोन टक्क्यांनी नुकसानीसह बंद झाले आहेत.
मोठय़ा घसरणीचा प्रभाव
शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या सेन्सेक्समधील 1066 अंकांच्या मोठय़ा घसरणीने संपूर्ण दिवसभरातील उलाढाल ठप्प केल्याचे पहावयास मिळाले होते. सदरच्या दीर्घकाळाच्या तेजीच्या प्रवासाला खंडित केल्याने कालच्या एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 3.3 लाख कोटी रुपये बुडाले होते. याच्या प्रभावामुळे आठवडय़ातील अंतिम दिवशी बाजारात काही प्रमाणात दबावाचे वातावरण दिवसभराच्या व्यवहारात दिसून आले. परंतु अखेर बाजारात उत्साह पुन्हा परतल्याने गुंतवणूकदारांची चिंता काहीशी लांबली आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्यासह अमेरिकेची येऊ घातलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यांचा प्रभाव बाजारावर होता.









