वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2020 च्या पहिल्या सहामाहीमध्ये बँकिंग सेवेशी संबंधीत तक्रारींमध्ये वेगाने वाढ झाली आहे. दुसरीकडे या तक्रारी सोडविण्यासाठी दुप्पट कालावधी लागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्या माहितीनुसार बँकेशी संबंधीत तक्रारींची एकूण संख्या 1 जानेवारी ते 30 जून 2020 पर्यंत 3.08 लाख इतक्या झाल्या आहेत. जो आकडा मागील वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत 57 टक्क्यांनी अधिक राहिलेला आहे.
तक्रार निवारण्यास अधिकचा कालावधी
प्राप्त अहवालानुसार सदरच्या तक्रारी या जनूच्या अगोदरपासून असून तेव्हा या तपासण्यासाठी 47 दिवसांचा कालावधी लागत होता. ज्यासाठी सध्याच्या घडीला 95 दिवस लागत आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 45 दिवस इतका कालावधी लागत होता. यामुळे तक्रारी सोडविण्याचा कालावधी हा कमी होण्याऐवजी दुप्पट वाढतो आहे.
एसबीआयच्या तक्रारीत घट
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य सरकारी बँकांच्या तक्रारींमध्ये घट आली आहे. स्टेट बँक आणि दुसऱया राष्ट्रीय बँकांचा हिस्सा घटून 59.65 टक्के झाला आहे. जो मागील वर्षात 61.90 टक्के होता.
सर्वाधिक तक्रारी एटीएम-डेबिट कार्डशी संबंधीत
आरबीआयच्या आकडेवारीनुसार विविध तक्रारींमध्ये एटीएम आणि डेबिट कार्डशी संबंधीत तक्रारीची नोंद 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगशी संबंधीत 13.38 टक्के तक्रारी आहेत. यासोबतच खराब बँकिंग सेवांबाबत समस्यांचा आकडा हा तिसऱया नंबरवर राहिलेला आहे.









