ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील विविध बँकांमध्ये मागील 10 वर्षांपासून कोणताही व्यवहार न झालेली 9 कोटी खाती आहे. त्या खात्यांमध्ये जवळपास 26 हजार कोटी रुपये पडून आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भारतीय बँकांमधील निष्क्रिय खाती आणि त्यामधील रकमेसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.
सीतारामन म्हणाल्या, 31 मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात जमाबंदी आणि एनबीएफसी खात्यांमध्ये अनुक्रमे 64 कोटी आणि 71 लाख रुपये असून, ती रक्कम मागील 7 वर्षांपासून तशीच पडून आहे. मागील 10 वर्षापासून कोणताही व्यवहार न झालेली 9 कोटी खाती देशातील विविध बँकांमध्ये असून, त्यामध्ये जवळपास 26 हजार कोटी पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने एका वर्षांहून अधिक निष्क्रिय किंवा कोणताही व्यवहार झालेल्या खात्यांचे दरवषी मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच खात्यांच्या निष्क्रियतेबाबत खातेधारकांकडून माहिती मागवण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
दरम्यान, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांची एक यादी संकेतस्थळावर सादर करण्याची सूचनाही बँकांना देण्यात आलेली आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.