शासनाच्या चुकीमुळे शेतकरी कर्जापासून वंचित
नांद्रे / वार्ताहर
नांद्रे येथील सांगली जिल्हा मध्यवती बँकेसह इतर बँकांनी देवस्थान, इनाम व इतर शर्ती असलेल्या शेतकर्यांना कर्ज पुरवठा बंद केला आहे. वर्षानुवर्षे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज दिले जात होते तसेच पुढेही द्यावे अशी मागणी नांद्रे विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप नेते बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सातबारा करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे मालकीहक्क डावलून त्यांची नोंद इतर हक्कात केली आहे. परिणामी अशा शेतकऱ्यांना कोणतीही बँक किंवा संस्था कर्ज देण्यास तयार होत नाही. गत वर्षापर्यंत या जमिनीवर सर्व बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. असे असताना केवळ शासनाच्या चुकीमुळे सातबारा मध्ये झालेली नोंद शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यापासून वंचित ठेवू लागली आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी ही चूक दुरुस्त करून मिरज आणि पलूस तालुक्यातील या शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.
यापूर्वी याच जमिनीवर सर्व प्रकारचे कर्ज मिळत होते. ते कर्ज शेतकरी वेळेवर भरत आसताना देखिल अचानकपणे या शेतकर्यांना कर्ज पुरवठा बंद केल्याने येथील शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. तरी तात्काळ पूर्ववत कर्ज पुरवठा करण्यात यावा आशी मागणी बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
Previous Articleपाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे
Next Article राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस








