चढ-उतार प्रवासात सेन्सेक्स निफ्टीची आपटी
वृत्तसंस्था/ मुंबई
बँकिंग समभागातील सलगच्या विक्रीमुळे शेअरबाजारात दबावाचे वातावरण राहिले असून या प्रवासात चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 194 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,935 वर बंद झाला आहे. प्रारंभीच्या काळात व्यवहारात सकारात्मक कल बाजाराने प्राप्त केला होता. परंतु लवकरच यामध्ये घसरणीस सुरुवात झाल्याचे पहावयास मिळाली.
दिवसभरात 500 अंकांचा नीचांकही यावेळी नोंदवला गेला आहे. मागील सत्राच्या तुलनेत सेन्सेक्स दिवसअखेर 194.17 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,934.73 वर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 62.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,131.80 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक घसरणीसह बंद झाले असून यांचे मूल्य 6 टक्क्मयांपर्यंत खाली आले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टील यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
आशियाई बाजारात सोमवारी मिळता जुळता कल पहावयास मिळाला आहे. अमेरिका आणि चीनसह दक्षिण कोरियामध्येही नवीन कोविडचे रुग्ण आढळल्याने बाजारात चढउताराचे वातावरण राहिले आहे. विदेशी मुद्रा बाजारातील डॉलरच्या तुलनेत रुपया 74.83 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला आहे. जागतिक बाजारात बेंट कच्चे तेल 0.43 टक्क्मयांनी घटून 43.59 डॉलरवर प्रति बॅरेलची बोली लावण्यात आली आहे.