नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातली कंपनी फ्लिपकार्ट हिला हरयाणा राज्य सरकारकडून मनेसारमध्ये आपल्या उद्योगासाठी जागा प्राप्त झाली आहे. कंपनीला मनेसारमधील पतली हाझीपूर येथे 140 एकरचा प्लॉट हरयाणा राज्य औद्योगिक आणि पायाभूत सुविधा महामंडळाने मंजूर केला आहे. वॉलमार्टची मालकी असणाऱया फ्लिपकार्टला या जागेमध्ये आपला व्यवसाय स्थापन करायचा आहे. पुढील तीन ते चार वर्षात यासंदर्भातले काम पूर्ण केले जाणार असल्याचे फ्लिपकार्टकडून सांगण्यात येते. जागेचा व्यवहार प्रति एकरी 3.09 कोटी रुपयांच्या हिशोबाने करण्यात आल्याचे समजते.
या बदल्यात हरयाणा सरकार त्या जागेत आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात येते. या सरकारच्या उचललेल्या पावलामुळे नजिकच्या काळात इतर गुंतवणूकदारांचेही लक्ष वेधले जाणार असून भविष्यात आणखी उद्योग उभारले जाण्याची शक्यता हरयाणा सरकारने बोलून दाखवली आहे.