डेन्मार्कवर 2-1 गोल्सनी मात, एम्बापेचे दोन गोल
वृत्तसंस्था/ कतार
2022 फिफा विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठणारा विद्यमान विजेता फ्रान्स हा पहिला संघ बनला असून शनिवारी येथील स्टेडियम 974 वर झालेल्या सामन्यात फ्रान्सने डेन्मार्कचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविले. कीलियन एम्बापे हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दोन्ही गोल नोंदवले.
या सामन्यात फ्रान्सने पूर्वार्धात डेन्मार्कपेक्षा सरस कामगिरी केली. त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. 21 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऍड्रियन रॅबियॉटने मारलेल्या हेडरला गोलरक्षक कॅस्परने सूर मारत अडविल्याने ही संधी वाया गेली. मध्यंतरास पाच मिनिटांचा अवधी असताना एम्बापेला गोलची चांगली संधी मिळाली होती. पण त्याने उस्मान डेम्बेलेकडून मिळालेल्या क्रॉसवर मारलेला फटका बारवरून बाहेर गेला. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात 61 व्या मिनिटाला फ्रान्सला पहिले यश मिळाले. थिओ हर्नांडेझच्या साथीने एम्बापेने आगेकूच केली आणि बॉक्समधून जोरदार फटक्यावर डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर श्मीचेलला हुलकावणी देत गोल नोंदवला.
पण त्यांची ही आघाडी सात मिनिटेच टिकली. 68 व्या मिनिटाला डेन्मार्कला आंद्रेयास ख्रिस्तेनसेनने बरोबरी साधून देणारा गोल नोंदवला. एरिकसनकडून आलेल्या कॉर्नर किकवर आंदेयासने बॉक्समधून जबरदस्त हेडरवर हा गोल नोंदवला. यानंतर दोन्ही संघांना काही संधी मिळाल्या. पण 86 व्या मिनिटाला फ्रान्सला एम्बापेने पुन्हा एकदा आघाडीवर नेले. ग्रीझमनकडून मिळालेल्या क्रॉस पासवर ताबा घेत एम्बापेने मांडीच्या आधारे चेंडूला गोलजाळीत टोलवले. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत फ्रान्सने एक सामना बाकी असतानाच बाद फेरी गाठली. फ्रान्सचा शेवटचा साखळी सामना टय़ुनिशियाविरुद्ध 30 रोजी होणार आहे तर डेन्मार्कची शेवटची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच दिवशी होणार आहे.









