ऑनलाईन टीम / पॅरिस :
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्यावर जात असल्याने देशात वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात भारताला मदत करण्याची तयारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूएल मॅक्रॉन यांनी दाखवली आहे.
भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीने कोणालाही सोडले नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत’.
चीननेही भारताला आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना चीनी माध्यमांनी भारतातील कोरोना परिस्थितीवर प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताकडे वैद्यकीय सामग्रीची कमतरता भासत आहे. कोरोना नियंत्रणासाठी चीन भारताला आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे’.