ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या मागील 2 महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे पुन्हा देशव्यापी कर्फ्यू लावण्याचा निर्णय फ्रान्स सरकारकडून घेण्यात आला. फ्रान्स सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अट्टल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
गॅब्रिएल अट्टल म्हणाले, फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरातील बाधितांची संख्या 26 हजारांवर गेल्याने सरकारने देशव्यापी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. हा कर्फ्यू प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. सकारात्मक परिणाम आल्यानंतर हा कर्फ्यू हटवला जाईल. फ्रान्समध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच त्यांना सात दिवस क्वॉरंटाईन रहावे लागणार आहे.
दरम्यान, या देशात आतापर्यंत 29 लाख 87 हजार 965 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामधील केवळ 2 लाख 14 हजार 538 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर 27 लाख 01 हजार 429 रुग्ण उपचार घेत आहेत. 71 हजार 998 रुग्ण दगावले आहेत.









