शिक्षकाच्या हत्येनंतर मशिदीला ठोकले टाळे : अनेक जण रडारवर
पॅरिस / वृत्तसंस्था
फ्रान्सच्या राजधानीत इतिहासाच्या शिक्षकाचा गळा चिरण्यात आल्याच्या घटनेनंतर सरकारने इस्लामिक कट्टरवादी संघटनांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. याचनुसार पॅरिसच्या उपनगरातील मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार ही मशीद 6 महिन्यांसाठी बंद केली जाणार आहे. मागील आठवडय़ात शुक्रवारी 47 वर्षीय शिक्षकाने वर्गात एक व्यंगचित्र दाखविल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती.
राजधानीच्या पेंटिन या उपनगरातील मशिदीने स्वतःच्या फेसबुक पेजवर हल्ल्यापूर्वी एक चित्रफित प्रसारित केली होती. या चित्रफितीद्वारे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्याविरोधात द्वेष फैलावण्यात आला होता. 6 महिन्यांपर्यंत ही मशीद बंद करण्याचा निर्णय दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे सीन-सेंट-डेनिस विभागाच्या प्रमुखांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.









