वृत्तसंस्था/पॅरीस
फ्रान्सचा फुटबॉलपटू ओसमेनी डिंबेली याला गुडघा दुखापत झाली असून त्याला युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना कदाचित मुकावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फ्रान्सच्या फुटबॉल संघाला जबरदस्त धक्का बसला आहे.
बुडापेस्ट येथे शनिवारी झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात डिंबेलीच्या गोलामुळे फ्रान्सला हंगेरीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखता आले होते. या सामन्यात खेळताना डिंबेलीच्या गुडघ्यातील स्नायूला दुखापत झाली असून डॉक्टरांनी या दुखापतीच्या अनेक चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा फ गटातील शेवटचा सामना पोर्तुगाल बरोबर बुडापेस्टमध्ये येत्या बुधवारी होणार आहे. या गटात फ्रान्सचा संघ पहिल्या स्थानावर असून पोर्तुगाल आणि जर्मनी हे अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया स्थानावर आहे. हंगेरी या गटात चौथ्या स्थानावर आहे.









