रुबलमध्ये व्यवहार करणार नसल्याची घोषणा
रशियाने युक्रेनमध्ये शिरून हल्ले करण्यास सुरुवात केल्यावर पाश्चिमात्य देशांनी त्याच्या विरोधात निर्बंध लादले आहेत. यामुळे डॉलरमध्ये होणारा रशियाचा कच्चे तेल व्यापार घटला आहे. स्वतःच्या कच्चे तेल आणि वायूच्या विक्रीसाठी रशियाला नवे खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती आहे. रशियाला भारत आणि चीनकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे रशिया असा खरेदीदार इच्छित आहे, ज्याच्यासोबतच्या व्यवहाराकरता डॉलर किंवा युरोची गरज भासणार नाही. याचदरम्यान फ्रान्सकडून रशियाला मोठा झटका बसला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाकडून गॅस खरेदीसाठी रुबलमध्ये पेमेंट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियासाठी जागतिक कच्चे तेल व्यापार करणे अवघड ठरू लागल्यावर त्याने सर्वच देश विशेषकरगून युरोपीय देशांना स्वतःच्या चलनात व्यवहार करण्याची सूचना केली. परंतु फ्रान्सने रशियाची मागणी फेटाळली आहे. पाश्चिमात्य निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.
रशियासोबतच्या करारातील तरतुदी स्पष्ट आहे. रशियाची मागणी करारानुरुप नाही. युरोपीय क्षेत्रात ज्या युरोपीय कंपन्यांना गॅस खरेदी करायचा आहे, त्यांना युरोमध्येच व्यवहार करावे लागणार आहेत. अशा स्थितीत रशियाकडून होणारी मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. युरोपमध्ये आता गॅस संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.
आमचे मित्रदेश नसलेल्यांना गॅस खरेदीसाठी रुबलमध्ये पेमेंट करावे लागेल असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. युरोपीय महासंघाच्या निर्बंधांनंतर रशिया आता पळवाट शोधत असल्याचा दावा मॅक्रॉन यांनी केला आहे. गॅसचा मोठा खरेदीदार जर्मनीनेही रशियाच्या मागणीला विरोध दर्शविला आहे.
रशियाकडून केलेली मागणी कराराच्या विरोधात असल्याचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज यांनी म्हटले आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आल्यावर युरोपीय देश आता रशियाच्या गॅसवरील निर्भरता कमी करण्याच्या दिशेने गांभीर्याने विचार करत आहेत. काही देशांनी आयातीत मोठी कपात केली आहे. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.









