सध्या मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’नं ‘फ्युचर ग्रुप’च्या ‘रिटेल बिझनेस’ला खिशात घालण्याच्या दृष्टीनं जोरदार तयारी चालविलीय…दुसऱया बाजूनं अझिम प्रेमजी यांची गुंतवणूक कंपनी आगेकूच करतेय ती ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’च्या साहाय्यानं त्याच समूहाच्या विमा व्यवसायावर ताबा मिळविण्याच्या दिशेनं…येऊ घातलेल्या दिवसांत या घडामोडी हमखास पूर्णत्वास जाण्याची शक्यता असून त्यांचा घेतलेला हा वेध…
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’नं (आरआयएल) पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल पुढं टाकलंय…आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या कंपनीची सध्या किशोर बियानींच्या ‘रिटेल बिझनेस’ला (फ्युचर ग्रुप) खिशात घालण्याची तयारी अगदी नेटानं चाललीय…करारात बहुतेक समावेश असेल तो ‘फ्युचर रिटेल’, ‘फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स’ आणि ‘फ्युचर सप्लाय चेन सॉल्युशन्स’ या बियानींच्या विख्यात तीन आस्थापनांचा…सुरुवातीला दर्शन घडेल ते कंपन्यांच्या विलीनीकरणाचं. त्यानंतर ‘आरआयएल’चा अधिग्रहणाच्या दिशेनं प्रवास सुरू होईल…दोन्ही समूहांमधील चर्चा वेगानं पुढं चाललीय अन् ‘रिलायन्स’ला 15 जुलैच्या ‘एजीएम’पूर्वी सर्व व्यवहार पूर्ण करायचाय. परंतु अजूनपर्यंत कित्येक बाबींसंबंधीची चर्चा अपूर्ण असून अंतिम करारावर स्वाक्षऱया करण्यात आलेल्या नाहीत…‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ व ‘फ्युचर ग्रुप’ यांच्यात चर्चा सुरू झाली ती यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, किशोर बियानींच्या एका ‘युनिट’ला कर्जाची परतफेड करणं न जमल्यानंतर…
बियानी यांना भारत ‘रिटेल किंग’ म्हणून ओळखतोय, पण त्यांचा कारभार घसरल्यानं त्यांना ‘रिटेल युनिट्स’मधील हिस्सा विकायचाय. शिवाय ‘विमा’ क्षेत्रातील संयुक्त आस्थापन ‘फ्युचर जनरली’चाr देखील विक्री करायचीय…‘फ्युचर ग्रुप’च्या ‘शेअर मार्केट’मध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या डोक्यावरचं कर्ज 30 सप्टेंबर, 2019 रोजी पोहोचलंय ते 12 हजार 778 कोटी रुपयांवर. त्यानं 31 मार्च, 2019 या दिवशी नोंद केली होती ती 10 हजार 951 कोटी रुपयांची…यापूर्वी विश्वातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती अमेरिकेच्या जेफ बेझोस यांच्या अजस्त्र ‘ऍमेझॉन’नं सुद्धा ‘फ्युचर ग्रुप’ला धडक देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. परंतु या क्षेत्रातील तज्ञांनुसार, किशोर बियानींच्या कर्जासंबंधीच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचं सामर्थ्य आहे ते मुकेश अंबानी यांच्यामध्येच…‘हा करार गुंतागुंतीचा असून ‘फ्युचर ग्रुप’ला प्रथम एकत्रीकरण करावं लागेल ते आपल्या आस्थापनांचं. त्यानंतरच ‘आरआयएल’ अधिग्रहण करेल ते ‘शेअर्स’च्या बदल्यात’, एका सूत्रानं दिलेली माहिती…
एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ‘फ्युचर समूहा’च्या विविध उद्योगांत ‘ऍमेझॉन’, ‘ब्लॅकस्टोन’ आणि ‘प्रेमजी इनव्हेस्ट’ यांनी यापूर्वीच गुंतवणूक केलेली असून त्यांना बहुतेक ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’चे ‘समभाग’ मिळतील…‘आरआयएल’चा होऊ घातलेला करार वैशिष्टय़पूर्ण ठरणार, कारण ‘ऍमेझॉन’नं सहा वर्षांपूर्वीच, 2014 साली किशोर बियानींना मिठी मारलीय, त्यांच्या समूहाशी भागीदारी केलीय. खेरीज गेल्या वर्षी बेझोस यांनी ‘फ्युचर रिटेल’मध्ये थेट गुंतवणूक न करताही हिस्सा मिळविला होता तो एका गुंतवणूकदाराच्या साहाय्यानं…
विश्लेषकांच्या मते, ‘रिलायन्स’ला प्राधान्य देणंच योग्य. कित्येक कंपन्यांची ‘फ्युचर’शी चर्चा चालू असली, तरी ‘स्ट्रटेजिक’ दिशा स्पष्ट दिसतेय. काही दिवसांपूर्वी मात्र वारं कुठल्या दिशेनं वाहतंय तेच कळत नव्हतं…‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ जवळपास सर्व ‘रिटेल’ उद्योगांचं अधिग्रहण करणार, तर ‘फ्युचर कन्झ्युमर’ आणि ‘फ्युचर मार्केट नेटवर्क्स’च्या ‘मॅन्युफेक्चरिंग’वर बहुतेक वर्चस्व असणार ते बियानींचं…सध्या दोन्ही कंपन्यांची चर्चा चालू असल्यामुळं अजूनपर्यंत कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाहीये…‘फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड’नं जानेवारी ते मार्च, 2020 या तिमाहीत नुकसान नोंदविलंय ते तब्बल 175.46 कोटी रुपयांचं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका वर्षापूर्वी जानेवारी ते मार्च, 2019 या तिमाहीत त्यांना 7.53 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. संपलेल्या संपूर्ण 2019-20 आर्थिक वर्षात या आस्थापनाला तोटा सहन करावा लागलाय तो 216.50 कोटी रुपयांचा…
विश्लेषकांच्या मतानुसार, ‘ऍमेझॉन’नं अप्रत्यक्षरीत्या ‘फ्युचर कुपन्स’मध्ये 4 टक्के हिस्सा खरेदी केलेला असला, तरी त्याचा परिणाम करारावर होण्याची शक्यता नाहीये…अमेरिकी कंपनीनं गेल्या वर्षी केलेल्या करारानुसार, ‘ऍमेझॉन’ला तीन वर्षांनी वा दहा वर्षांपूर्वी किशोर बियानींचे सर्व ‘शेअर्स’ किंवा काही समभाग खिशात घालण्याची संधी मिळेल. त्यासाठी विशिष्ट आर्थिक परिस्थिती व कायद्याचा विचार करण्यात येईल…‘ऑनलाईन’ नि ‘ऑफलाईन’चा विचार केल्यास बियानींशी केलेल्या कराराचा मुकेश अंबानींना प्रचंड लाभ मिळेल. ‘फ्युचर रिटेल’चs देशात वेगवेगळय़ा प्रकारचे 1 हजार 500 स्टोअर्स असून त्यात समावेश ‘बिग बझार’, ‘निलगिरीस्’, ‘इजीडे’सारख्या ‘ब्रँड्स’चा. त्याखेरीज ‘फ्युचर लाईफस्टाईल’च्या 300 स्टोअर्सनी ‘लाईफ सेंट्रल’ अन् ‘ब्रँड फॅक्टरी’ या ‘ब्रँड्स’च्या साहाय्यानं भारताला धडक दिलीय. त्यापैकी काहींचा वापर ‘ऍमेझॉन’च्या किराणामालाच्या ‘ऑर्डर्स’साठी करण्यात येतोय…
दरम्यान, ‘विप्रो’चs अब्जाधीश संस्थापक अझिम प्रेमजाr यांची गुंतवणूक कंपनी ‘प्रेमजी इन्व्हेस्ट’ आणि ‘एसबीआय’ जनरल इन्शुरन्स’ यांनी संयुक्तरीत्या लक्ष केंद्रीत केलंय ते ‘फ्युचर ग्रुप’च्या ‘फ्युचर जनरली’वर…‘फ्युचर समूह’ विमा व्यवसायातील हिस्सा विकण्यास उत्सुक असून बियानींचं भागीदार आस्थापन इटलीच्या ‘जनरली ग्रुप’चा भारताला ‘गूडबाय’ म्हणण्याचा विचार चाललाय…विशेष म्हणजे ‘प्रेमजी इन्व्हेस्ट’चा ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’मध्ये देखील 16 टक्के हिस्सा आहे. अझिम प्रेमजींनी या व्यवहाराला जन्म दिला तो गेल्या वर्षी. त्यावेळी ‘इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप’नं ‘एसबीआय’मधील 26 टक्के हिश्श्याची विक्री केली होती…‘वॉरबर्ग पिनकस्’नंही शिल्लक राहिलेला 10 टक्के हिस्सा खिशात टाकला…विश्लेषकांच्या मते, इटलीची कंपनी आपल्या देशातून माघार घेण्यास सज्ज असल्यामुळं येऊ घातलेल्या दिवसांत ‘फ्युचर समूहा’नं संपूर्ण हिस्सा विकल्यास आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये…
किशोर बियानींच्या ‘फ्युचर ग्रुप’नं यापूर्वी हिस्सा विकण्यासाठी ‘हिरो कॉर्पोरेट सर्व्हिसेस’ आणि ‘प्रायव्हेट इक्विटी फर्म्स’ ‘मल्टिपल्स’ व ‘ट्रू नॉर्थ’ यांच्याशी चर्चा केली होती…‘फ्युचर जनरली’ची स्थापना करण्यात आली ती 2007 साली. ‘रिटेल’, ‘व्यावसायिक’, ‘वैयक्तिक’ अन् ग्रामीण भागांतील लोकांची ‘विम्या’च्या साहाय्यानं गरज भागविणं हा उद्देश. ‘फ्युचर जनरली’च्या खिशात 3 हजार ‘कॉर्पोरेट’ ग्राहक नि कंपनीच्या मुठीत 3 हजार 600 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन…‘प्रेमजी इन्व्हेस्ट’चा सध्या ताबा आहे तो तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेच्या सार्वजनिक व खासगी गुंतवणुकीवर. अझिम प्रेमजी यांच्या आस्थापनानं ‘विम्या’च्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय असंच म्हणावं लागेल…
जर सर्व व्यवहारानं योग्य दिशेनं प्रवास केला, तर कदाचित दर्शन घडेल ते ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एसबीआय) व ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ यांच्यातील विलीनीकरणाचं…या पार्श्वभूमीवर छान संधी मिळेल ती ‘प्रेमजी इन्व्हेस्ट’ला, कारण कंपनीच्या ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’मधील हिश्श्यात वाढ होईल…यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ‘फ्लिपकार्ट’चे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी 100 कोटी रुपये ओतून अधिग्रहण केलं ते ‘वाधवान ग्लोबल कॅपिटल’च्या ‘डीएचएफएल जनरल इन्शुरन्स’चं, तर 2019 साली ‘मॅक्स’नं ‘मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स’मधील 51 टक्के हिस्सा खसगी ‘इक्विटी’ कंपनी ‘ट्रू नॉर्थ’ला विकला होता तो 510 कोटी रुपयांना…त्याशिवाय ‘सॉफ्टबँक व्हिजन फंड’नं ‘ईटेकएस्स मार्केटिंग अँड कन्सल्टिंग’चा 13 कोटी डॉलर्स गुंतवणूक करून आणखी हिस्सा खरेदी केलाय. ‘पॉलिसी बझार’ व ‘पैसा बझार’ या दोन ऑनलाईन वित्तीय सेवा पोर्टल्सची मालकी आहे ती याच कंपनीकडे. यामुळं ‘सॉफ्टबँक’चा सदर आस्थापनातील वाटा आता पोहोचलाय 15 टक्क्यांवर!









