फोर्ब्स इंडियाकडून श्रीमंतांची यादी सादर : मुकेश अंबानी 13 व्या वषीही धनाढय़ांमध्ये अव्वल
पुणे / प्रतिनिधी
भारतातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत कोरोना लसीवर काम करणाऱया सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांची एन्ट्री झाली असून, टॉप टेनमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत मुकेश अंबानी यांचे पहिले स्थान कायम असून, त्यांची संपत्ती 88.7 बिलीयन डॉलर इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीत एका वर्षात 37.7 बिलीयन डॉलर एवढी वाढ झाली आहे.
फोर्ब्सच्या यादीत दुसऱया क्रमांकावर अदानी समुहाचे गौतम अदानी, तिसऱया स्थानावर एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर, चौथ्यावर एवेन्यू सुपरमार्टचे राधाकिशन दमानी, पाचव्या स्थानावर अशोक लेलँडचे हिंदुजा ब्रदर्स, सहाव्या स्थानावर सिरमचे सायरस पूनावाला, सातव्या स्थानावर शापूरजी पालोनजी ग्रुपचे पालोनजी मिस्त्राr, आठव्यावर कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक, नवव्यावर गोदरेज फॅमिली, तर दहाव्या स्थानावर आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल आहेत.
कोरोनावरील लसीच्या उत्पादनात सिरम
सिरमचे सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱया सायरस पूनावाला यांच्या संपत्तीत वाढ झाली असून, पूनावाला यांची संपत्ती 11.5 बिलीयन डॉलर एवढी आहे. ऑक्सफर्डच्या कोविडवरील लसीच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिटय़ूट काम करीत आहे. त्यामुळे भारतासह सर्व जगाचे लक्ष सिरम व या संस्थेची कमान सांभाळणाऱया पूनावाला यांच्यावर आहे. सिरम संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करून देण्यात सारयस पूनावाला यांचा मुख्य वाटा असून, त्यांचे पुत्र आदर पूनावाला यांच्याकडे सध्या या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी आहे. सिरमकडून कोरोनावरील लसीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होणार असून, सध्या तिसऱया टप्प्यांतर्गत मानवी चाचण्या सुरू आहेत.
आयसीएमआर पुरस्काराने झाला होता गौरव
सिरमचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. सायरस पूनावाला यांचा मागील वर्षी ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला होता. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहअध्यक्ष या नात्याने बिल गेट्स यांनी आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. सिरम ही भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, 1966 साली तिची स्थापना करण्यात आली होती. विविध आजारांवरील जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी ही मोठी कंपनी म्हणून आज जगभर ती नावारुपाला आली आहे. फोर्ब्स यादीतील समावेशाने पूनावाला यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतातील पहिले दहा श्रीमंत…..
क्रमांक नाव कंपनी संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
1 मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज 88.7
2 गौतम अदानी अदानी पोर्ट्स ऍण्ड सेज 25.2
3 शिव नाडर एचसीएल टेक्नॉलॉजी 20.4
4 राधाकृष्ण दमानी एवेन्यू सुपरमार्ट 15.4
5 हिंदुजा ब्रदर्स अशोक लेलँड 12.8
6 सायरस पूनावाला सिरम इन्स्टिटय़ूट 11.55
7 पालनजी मिस्त्राr शापूरजी पालनजी समूह 11.4
8 उदय कोटक कोटक महिंद्रा बँक 11.3
9 गोदरेज फॅमिली गोदरेज समूह 11
10 लक्ष्मी मित्तल आर्सेलर मित्तल 10.3








