वृत्तसंस्था/ साणंद
गुजरातच्या साणंद येथील फोर्ड मोटर्सच्या प्रवासी वाहन निर्मिती प्रकल्पाचे अधिग्रहण करण्यास टाटा मोटर्सला अनुमती मिळाली आहे. मागील आठवडय़ाच्या प्रारंभी गुजरात मंत्रिमंडळाने या व्यवहाराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. फोर्ड मोटर्स कंपनीने मागील वर्षाच्या अखेरीस भारतातून गाशा गुंडाळणार असल्याची घोषणा केली होती. साणंदमध्ये कंपनीच्या प्रवासी वाहन निर्मिती प्रकल्पाने एप्रिल महिन्यात कामकाज थांबविले होते.
राज्य मंत्रिमंडळाने या व्यवहाराकरता ना हरकत प्रमाणपत्रही जारी केले आहे. टाटा मोटर्स आणि फोर्ड यांच्यात सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार होणार आहे. दोन्ही कंपन्या आता व्यवहाराचा आकार, कामगार विषयक मुद्दय़ांवर चर्चा करत आहेत.
30 मे रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरीसाठी आयोजित होणाऱया समारंभात दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने फोर्ड कंपनीला दिलेले सर्व लाभ टाट मोटर्सला देण्यास सहमती दर्शविली आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी फोर्डने जागतिक बाजारासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीची योजना मागे घेतली होती.
पीएलआय स्कीमचा अर्ज मागे
फेब्रुवारी 2022 मध्ये भारत सरकारकडून घोषित प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत निवडण्यात आलेल्या 20 कंपन्यांमध्ये फोर्ड इंडियाचा समावेश होता. परंतु फोर्ड इंडियाने या योजनेतून माघार घेतली होती.