ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यातच आता फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा भाग कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत शंभर वर्ष जुनी होती. ही पाच मजल्यांची इमारत असून इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला आहे. इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीला टेकू देखील लावण्यात आले होते. साधारण पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्याला सुरुवात केली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले असल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर इमारतीत राहणाऱ्या अन्य नागरिकांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू आहे.