नोबेलविजेत्या संशोधकाची कमाल : 5 मिनीटात अहवाल
नोबेल पुरस्कार विजेत्या जेनिफर डोडना यांनी विशेष प्रकारची कोविड चाचणी विकसित केली आहे. संबंधित नमुन्यात कोरोना विषाणूची संख्या किती आहे हे या चाचणीतून 5 मिनिटांत समजते. चाचणीकरता जीन-एडिटिंग तंत्रज्ञान आणि मोबाइल फोन कॅमेऱयाचा वापर करण्यात आला आहे.
सायन्स नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार कोविड चाचणीत सीआरआयएसपीआर जीन एडिटिंग टूलचा वापर करण्यात आला आहे, हे टूल अमेरिकन संशोधिका जेनिफर डोडना यांनी विकसित केले आहे. जेनिफर यांना याचकरता यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ही चाचणी मोठय़ा प्रमाणावर लोकांसाठी उपलब्ध झाल्यास घरातच कोविड चाचणी करणे सोपे ठरणार आहे.
आरएनएचा थांगपत्ता लावणार
माणसांकडून प्राप्त नमुन्यांवर जीन एडिटिंग टूलचा वापर केला जातो. नमुन्यांमध्ये कोरोनाचे किती विषाणू आहेत हे या टूलद्वारे समजणार आहे. चाचणीदरम्यान या टूलच्या मदतीने नमुन्यांमध्ये कोरोनाच्या विशेष प्रकारच्या आरएनएचा शोध लावला जातो. चाचणीदरम्यान हे टूल आरएनए फ्लोरोसेंट पार्टिकल्स सोडते, जे मोबाईल कॅमेऱयाच्या मदतीने बाहेर पडणाऱया लेझर लाइटच्या संपर्कात आल्यावर प्रकाश परावर्तित करतात. नमुन्यांबाबतीत असे घडल्यास विषाणू असल्याची पुष्टी मिळते आणि अहवाल पॉझिटिव्ह येतो.
जलद चाचणी
कमीत कमी वेळेत विषाणूची चाचणी करणाऱया क्विक टेस्टिंगद्वारेच योग्यवेळी संक्रमणाचा शोध लावला जाऊ शकतो. यात यश आल्यास उपचार वेगाने सुरू करून जीव वाचविला जाऊ शकतो. महामारीच्या प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी चाचणी महत्त्वाची असल्याचे म्हटले होते.









