मोबाईल फोन महागणार? – एप्रिलपासून इंपोर्ट डय़ूटी 2.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध टप्प्यांवर बदल होणार असल्याचे संकेत आहेत. यात सर्वात आधी म्हणजे गाडय़ा महागणार आहेत. मारुती, निस्सानच्या कार महागणार असून होंडाने आपल्या दुचाकीच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता या यादीमध्ये मोबाईल फोनचा समावेश होणार असल्याची माहिती आहे.
साधारणपणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी मोबाईल पार्टस, मोबाईल चार्जर आणि ऍडॉप्टर, गॅजेट्स बॅटरी, हेडफोन या उपकरणांवर इंपोर्ट डय़ूटी 2.5 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुरू होणार असून यामुळे 1 एप्रिलपासून फोनच्या किमती वाढण्याचे संकेत आहेत.
सदरच्या निर्णयातून सरकार 20,000 कोटी ते 21,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त करणार असल्याचा अंदाज आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे सरकारला महसूल प्राप्तीत मोठे नुकसान झाले असल्याने हा निर्णय घेतल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.
कोरोना संकटाचा कालावधी व भारत चीन यांच्यातील सीमावादामुळे केंद्राने आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या संकल्पनेला बळ देण्यासाठी सरकारने निवडक उत्पादनांना देशातच निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची कल्पना राबवली गेली. परिणामी अनेकांनी भारतातच उत्पादन निर्मितीवर जोर द्यायला सुरूवात केली.
मागील 4 वर्षांत 10 टक्क्यांपर्यंत वाढ
सरकारने मागील चार वर्षांच्या कालावधीत सदरच्या उत्पादनांवर जवळपास 10 टक्क्यांची इंपोर्ट डय़ूटी वाढविली आहे. देशामध्ये मोबाईल फोनचे उत्पादन जवळपास तीन पटीने वाढले आहे. परंतु त्यांची अन्य उपकरणे महाग होण्याचा फटका ग्राहकांना मोबाईल खरेदी करताना बसणार असल्याची शक्यता आहे. मागे वळून पाहिल्यास वर्ष 2016-17 पर्यंत देशामध्ये 18,900 कोटी रुपयांच्या मोबाईल फोन्सची निर्मिती करण्यात आली आहे. 2019-20 मध्ये हा आकडा 1.7 लाख कोटी रुपयावर पोहचल्याची माहिती आहे.









