मुख्य बाजारपेठेतील विक्रेत्यांचा पालिकेवर धडक : मंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याशी चर्चा
प्रतिनिधी / फोंडा
दिवाळीचा बाजार फुटपाथवर भरविला जाऊ नये, तसेच मुख्य बाजारपेठेच्या पाठिमागे असलेल्या खासगी जागेत भरविला जाणारा बाजार बंद करावा या मागणीसाठी फोंडा बाजारपेठेतील शंभरहून अधिक विक्रेत्यांनी आपला व्यापार बंद ठेऊन फोंडा पालिकेवर धडक दिली. गुरुवारी सकाळी पालिका मंडळाची बैठक होती. यावेळी हे विक्रेते पालिकेसमोर जमले. बैठकीला उपस्थित असलेले फोंडय़ाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक व नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासमोर त्यांनी आपली गाऱहाणी मांडली.
दिवाळीचा बाजार मुख्य बाजारपेठेच्या बाहेर फुटपाथवर भरविण्यास या विक्रेत्यांनी जोरदार विरोध केला. परराज्यातील विक्रेते दिवाळीसाठी लागणारे विविध सामान घेऊन काही दिवसांसाठी फोंडय़ात येतात व कमाई करुन जातात. त्यांना व्यापारासाठी फुटपाथवर मोक्याची जागा दिली जात असल्याने त्यांच्याकडून विक्रीसाठी आणली जाणारी फुले, फळे, भाजी व अन्य वस्तू हातोहाथ खपते. सर्व साहित्य रस्त्यावर मिळत असल्याने ग्राहक मुख्य बाजारपेठेत फिरकत नाहीत. त्यामुळे पालिकेला नियमित सोपो भरुनही व्यापारात नुकसानी सोसावी लागते, असे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.
त्यांची अन्य एक मागणी म्हणजे, कोरोना काळात पर्यायी सोय म्हणून भाजी मार्केटच्या पाठिमागे असलेल्या अप्रोच रोडवर भरविण्यात आलेला बाजार आता मिनी मार्केट बनले आहे. याठिकाणी भाजी, मासळी व मसाल्यांपासून सर्व सामान मिळते. त्यामुळे ग्राहक मुख्य बाजारात फिरकत नाहीत. त्याचाही मुख्य बाजारपेठेतील विक्रेत्यांना फटका बसत आहे. यासंबंधी पालिका मुख्याधिकाऱयांना लेखी निवेदन दिले होते व त्यांनी चतुर्थीनंतर खासगी जागतील या विक्रेत्यांना तेथून दुसऱया जागेत हलविण्याचे आश्वासन दिले होते. आता दिवाळी आली तरी हा मिनी बाजार तेथेच भरतो. तो तात्काळ बंद करण्याची मागणी या व्यापाऱयांनी केली. मंत्री रवी नाईक यांनी व्यापाऱयांची ही गाऱहाणी ऐकून घेतली व पालिकेशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही आपण मुख्याधिकाऱयांकडे त्यासंदर्भात बोलून योग्य ती कारवाई करणार असल्याचे व्यापाऱयांना सांगितले.









