मगो उमेदवार डॉ.केतन भाटीकर यांचा जाहीरनामा
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा मतदारसंघातील मगो पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला दहा कलमी जाहीरनामा नुकताच जाहीर केला. त्यामध्ये फोंडय़ातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न, खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, पाण्याची समस्या, ट्रक टर्मिनल्स या मुद्यांवर त्यांनी भर दिला आहे.
फोंडा मतदारसंघात आपण आत्तापर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. फोंडय़ातील सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर आपण सातत्याने आवाज उठवित आहे. उपजिल्हा इस्पितळात रक्तीपेढी विभाग, सीटी स्कॅन व अन्य अत्यावश्यक वैद्यकी सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपले प्राधान्य असेल. सध्या सरकारी नोकऱया केवळ सत्तरी तालुका व साखळी मतदारसंघातच दिल्या जातात. फोंडय़ातील सुशिक्षित उमेदवारांवर यापुढे हा अन्याय होणार नाही. मलनिस्सारण व अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामांमुळे वारंवार खोदले जाणारे रस्ते ही फोंडा शहरातील प्रमुख समस्या आहे. या पुढे नियोजनाअभावी रस्ते खोदले जाणार नाहीत व अशा कामामुळे लोकांना त्रास होणार नाही. राजधानी पणजीसह बहुतेक गोव्याला फोंडय़ातील ओपा पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. मात्र फोंडा शहर व आसपासच्या भागात अजूनही लोकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पाणी पुरवठय़ात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपला प्राधान्य क्रम राहील असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.
फोंडा पालिका क्षेत्रातील कचऱयाची समस्या निकाली काढतानाच कचरा गोळा करणाऱया कामगार कुटुंबीयांचे आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यासाठी भर देणार आहे. कुर्टी व फोंडा शहरातील बगल रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने पार्क केली जातात. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी जाहीरनाम्यात प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरेवक शिवानंद सावंत, विन्सेंत फर्नांडिस हे उपस्थित होते.









