बुधवार पेठ, शहर परिसर, सपना पार्क येथे जागृती फेरी
प्रतिनिधी/ फोंडा
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर फोंडा पोलिसांनी बुधवार पेठ मार्केट परिसरात कोरोना जागृती मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी या जागृती मोहीमेचे नेतृत्व केले. विनाकारण बाहेर पडू नका, फेसमास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
फोंडा पोलिसांनी काल रविवारी बुधवार पेठ बाजार परिसरातील व्यापारी व ग्राहकांशी संपर्क साधला. लाऊडस्पिकरवर कोरोनाविषयी दक्षता पाळण्याची नियमावली सांगितली. विनामास्क आढळलेल्या एकूण 53 व्यापारी व ग्राहकांना चलन फाडण्यात आले. कोविडचा प्रसार वाढू नये म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा माहोल टाळा, उत्तर व दक्षिण गोव्यात 144 कलमअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून सर्वानी सामाजिक अंतर राखावे असे आवाहन केले आहे. उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांच्या जागृती टिममध्ये कॉन्स्टेबल सिद्धेश गावस,धावेश खरात, सुशांत गावस, अक्षय नाईक व शुभम शिवोलकर यांचा सहभाग होता.









