प्रतिनिधी/फोंडा :
फोंडा पोलीस स्थानकातील कोविड स्वॅब चाचणी केलेल्या 104 पोलीस कर्मचाऱयांचा अहवाल गुरुवारी दुपारी उपलब्ध झाला. त्यापैकी 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. बुधवारी दोघा पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस निरीक्षक कोरोनाबाधीत आढळून आले होते. त्यामुळे पोलीस स्थानकातील कोरोनाबाधितांची संख्या 18 झाली आहे. अशाप्रकारे बाधित आढळून येणारे हे गोव्यातील पहिले पोलीस स्थानक ठरले आहे.
फोंडा पोलीस स्थानकात आतापर्यंत 18 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. गुरुवारी उपलब्ध झालेल्या अहवालानुसार एक उपनिरीक्षक, एक साहाय्यक उपनिरीक्षक तसेच तीन महिला पोलीस कर्मचारी, एक गृहरक्षक व एक 108 रुग्णवाहिका कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. अचानक एवढय़ा मोठय़ा संख्येने कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खबरदारीचे उपय म्हणून जनतेसाठी पुढील काही दिवस पोलीस स्थानक बंद राहणार आहे.
गुरुवारी सकाळी पोलीस स्थानकाच्या संपूर्ण इमारतीमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तालुक्यातील सर्व पोलीस चौकीवरील कर्मचाऱयांचीही तपासणी करुन नमुने गोळा करण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस पोलिसांनी अत्यावश्यक सेवा सोडल्यास नागरिकांशी थेट संपर्क टाळण्याचा सल्ला आरोग्य खात्यातर्फे देण्यात आला आहे. फोंडा पोलीस स्थानकाच्या आसपास असलेली काही दुकाने स्वच्छेने बंद ठेवण्यात आली आहेत.
पोलीस महानिरीक्षकांनी दिली भेट
राज्याचे पोलीस महानिरीक्षक परमादित्य व दक्षिण गोव्याचे अधीक्षक पंकज कुमार यांनी गुरुवारी सकाळी फोंडा पोलीस स्थानकाला भेट दिली. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन केले. कर्तव्य बजावताना स्वत:ची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.
सेनिटायझर्स व सुरक्षेसंबंधी वापरावयाच्या विविध वस्तुंचे किट पोलीस कर्मचाऱयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचा तात्पुरता ताबा सध्या वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही यावेळी उपस्थित होते.









