कोरोना काळात सेवानिवृत्तांना मुदतवाढीचा निर्णय
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱयांना सेवेत मुदतवाढ देण्याविषयी जबरदस्त खडाजंगी काल झालेल्या पालीकेच्या खास बैठकीत झाली. तरीही विरोधी नगरसेवकांना न जुमानता आवाजी मतदानाने सदर ठराव मंजूर करून घेण्यात आला. याप्रकरणी पीएमओ कार्यालयात दाद मागणार असल्याचा पवित्रा कर्मचऱयांच्यावतीने विरोधी नगरसेवकांनी घेतला आहे. नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली फोंडा पालिकेच्या सभागृहात काल शुक्रवारी झालेल्या खास बैठकीत मुदतवाढ या विषयावर जबरदस्त खडाजंगी झाली.
यावेळी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, पालिकेचे मुख्याधिकारी केदार नाईक, नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, जया सावंत, विरेंद्र ढवळीकर, यतीश सावकार, व्यंकटेश नाईक, गीताली तळावलीकर, अमिना नाईक, प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. नगरसेवक शांताराम कोलवेकर अनुपस्थित होते. प्रात्प माहितीनुसार पालीकेचे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे. एका अधिकाऱयाला मुदतवाढ देऊ नये असे निवेदन मुख्याधिकाऱयाना येथील सुमारे 43 कर्मचाऱयांनी सह्य़ानिशी सादर केले आहे. सदर निवेदनावर बैठकीत चर्चेत आणलेच नसून त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गिताली तळावलीकर यांनी केला आहे. कोरोनाकाळात आधीच रोजगारांच्या संधी कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सेवानिवृत्तांना मुदतवाढ का ? जे पालीका कर्मचारी बढतीच्या प्रतिक्षेत आहेत त्याच्यावर अन्याय का? असा सवाल विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
मुदतवाढीमुळे पालीकेवर रू. 10 लाखाचा बोजा
सेवानिवृत्तीनंतर मुदतीवाढीमुळे पालीकेवर वार्षिक सुमारे रू. 10 दहा लाखाचा बोजा वाढणार असून त्य़ाच्या वेतानातून आणखी 4 जणांना रोजगार सहज उपलब्ध होण्याची शक्यता विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्य़क्ष बाजू ऐकून घेण्याची परिस्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. सन 2014 साली सेवानिवृत्त कर्मचाऱयांना मुदतवाढ देऊ नये असा ठराव घेतल्याचे तळावलीकर यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर भाष्य करताना नगराध्यक्ष दळवी यांनी यापुर्वीही उत्कृष्ट सेवा बजावणाऱया अधिकाऱयाला सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ दिली असल्याची माहिती दिली. यावेळी त्या अधिकाऱय़ाला 1 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर फक्त डीए भत्ता वगळता त्याला निवृत्तीवेळी मिळत असलेले वेतन मिळणार असल्याचे दळवी म्हणाले, सदर प्रस्ताव मान्यतेसाठी पालीका प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
सदर प्रस्तावविरोधात विरोधकांची बाजू ऐकून न घेतल्याचा आरोप करून सदरप्रकरणी पीएमओ कार्यालयात लेखी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा तळावलीकर यांनी दिला.
कचरा व्यवस्थापनासाठी नेस्लेचा पुढाकार
शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी तीन वर्षाच्या काळासाठी उसगांव येथील नेस्ले कंपनीने स्वखर्चाने पुढाकार घेतलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्षांनी शहरात कचरा व्यवस्थापन व्यवस्थित असून पालीकेतर्फे घरा-घरातून कचरा गोळा करण्यात येत असल्याचे सांगितले. कुडतरकर नगरी येथे वॉकींग टेकवर सेन्थिटीक ट्रेक बनविण्याचा मागणी येथील रहिवासीयांनी केली आहे. त्यानुसार एसएजी यांच्या माध्यमातून सदर काम हाती घेण्यात येणार आहे. वाहतूक खात्याच्या विनंतीनुसार शहर परिसरात सुचनाफलक उभारण्याचे काम प्राधान्यक्रमाने घेतले जाईल. राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर यांच्यातर्फे खासदार निधीतून मलनिस्सारणवाहू टॅकर व टोव्हींग वाहन देण्यात आले आहे. त्यासाठीही मान्यता यावेळी घेण्यात आली आहे. सोपे कर आकारणीसाठी कंत्राटदाराचा सहा महिन्याचा कालावधी संपत असून त्याला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ द्यावी की नाही याविषयी सदर फाईल अभ्यासासाठी मुख्याधिकाऱयाकडे वळविण्यात आली आहे. अशा विविध विषयावर खास बैठकीत ठराव मंजूर करण्यात आले.