प्रतिनिधी/ फोंडा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खुद्द त्याच्याच गावात ज्यावेळी स्वीकारले जात नसत, तेव्हा फोंडा पालिकेच्या मुक्तीधाम या सार्वजनिक स्मशानभूमीत अशा मृतांना शेवटचा अग्नी दिला गेला. सुरुवातीला तर कोरोनाचे मृतदेह जाळण्यास फोंडय़ात बराच विरोध व मतभेदही झाले. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. कोरोनामुळे दिवसाकाठी किमान पाच ते सात लोकांचे बळी जातात. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत फोंडा स्मशानभूमीत तब्बल 27 कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेले, हे कोरोनाचे बळी केवळ फोंडा पालिका क्षेत्र किंवा फोंडा तालुक्यातील नसून राज्याच्या विविध भागातील आहेत. एकाच दिवसात दोन ते तीन मृतांवरही याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास फोंडय़ात अंत्यविधी केलेल्या या मयत व्यक्ती माशेल, आडपई, उसगांव, शिरोडा, मोले तसेच वास्को व सत्तरी अशा विविध भागातील आहेत. 26 जून रोजी सत्तरी व वास्को येथील अशा दोघां व्यक्तींचा कोरोनामुळे एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्यावेळी दोन्ही गावामध्ये या मृतांवर अंत्यविधी करण्यास कुणीच तयार नव्हते. त्यामुळे सरकारी यंत्रणांसमोर पेच निर्माण झाला. हे मृतदेह कुटुंबीय किंवा ग्रामस्थ स्वीकारीत नसल्यास इस्पितळातच त्यांची विल्हेवाट लावण्याचा विचार होता. मात्र नंतर दोन्ही मृतदेह पूर्ण निर्जंतूक करून व प्लास्टिक आवरणात सुरक्षितरित्या बंदीस्त करून वास्को येथील स्मशानभूमीत नेण्याची तयारी झाली. तेथेही अंत्यसंस्कार करण्यास जोरदार विरोध झाला. अखेर त्याच रात्री फोंडा पालिकेच्या स्मशानभूमीत या दोन्ही मृतांवर अग्नीसंस्कार करण्यात आले. फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी केदार नाईक, फॉरेन्सीक तज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांच्या उपस्थितीत हॉस्पिसियो व ईएसआय इस्पितळातील प्रत्येकी एक कर्मचारी व 108 रुग्णवाहिकेवरील दोघे एवढय़ा लोकांच्या उपस्थितीत हे क्रियाकर्म करावे लागले. त्यात विशेष धाडस दाखवले ते फोंडा पालिकेच्या मजुरांनी.
राज्यात तीन ठिकाणी अंत्यसंस्काराची सोय
आज परिस्थिती थोडीशी बदलली आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह स्वीकारून त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. सार्वजनिक स्मशानभूमी सोडल्यास सात ते आठ मृतांवर त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार करण्याचा पायंडा काही ग्रामस्थांनी घालून दिला. या उलट अजून बऱयाच गावामध्ये मृतदेह स्वीकारण्याची मानसिकता तयार झालेली नाही. फोंडा पालिकेच्या स्मशानभूमीसह सांतिनेज व वास्को येथील सरकारी स्मशानभूमीत सध्या कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. मडगाव येथील हिंदू स्मशानभूमीत दिवसाकाठी केवळ दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत कोरोना मृतांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुतेकांना फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे अधिक सोयीस्कर ठरू लागले आहेत.
मृतांच्या अंत्यसंस्काराचे मॉनिटरिंग
कोरोनासंबंधी नवीन एसओपीनुसार सरकारने कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराचे मॉनिटरिंग करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्ना आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शववाहिका उपलब्ध करुन देण्यापासून प्रत्यक्ष अंत्यसंस्कार होईपर्यंत त्यासंबंधी मॉनिटरिंग केले जाते.
त्या तिघा मजुरांची निर्भिड सेवा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या या अंतिम प्रवासाच्यावेळी काही मोजकेच कुटुंब सदस्य उपस्थित असतात. अत्यंत घाईगडबडीत अग्नीसंस्कार उरकावे लागतात. अशावेळी चितेची लाकडे रचण्यापासून पुढील सर्व सोपस्कार फोंडा पालिकेचे कामगार लक्ष्मण भजंत्री, मंगेश कडेकर व विनायक खेडेकर हे मोठय़ा निष्ठेने करतात. आत्तापर्यंत फोंडा स्मशानभूमीत जेवढय़ा कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या सर्व चिता या तिघांनी रचल्या आहेत. एखादा मृतदेह स्मशानभूमित पोचायला रात्र झाली तरी उशिरापर्यंत ते थांबतात. एकाचदिवशी दोन ते तीन कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केल्याचे भजंत्री सांगतात. लक्ष्मण भजंत्री हा गेल्या 20 वर्षांपासून फोंडा स्मशानभूमीत चिता रचण्याचे काम करीत असून आजवर हजारो मृतांच्या चिता त्याने रचलेल्या आहेत.
फोंडय़ातील स्मशानभूमित कोरोनाच्या काळात जे क्रियाकर्म सुरु आहे, त्यात कुठलीच अडचण येऊ नये व लोकांना दिवसभरात कुठल्याहीवेळी ही सेवा देण्यास पालिका तत्पर आहे. मुख्याधिकारी केदार नाईक यांनी तर यापूर्वी स्वत: उपस्थित राहून रात्रीच्यावेळी ही जबाबदारी पार पाडली आहे. स्मशानभूमित सेवा देणारे लक्ष्मण व अन्य दोघे मजूर तर कोरोना योद्धेच आहेत, असे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.









