भाजप की मगो : कोण ठरणार कुणावर भारी ?
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा नगरपालिकेसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज रविवार दि. 7 रोजी होणार आहे. एकूण 15 पैकी 13 प्रभागांसाठी मतदान झाले होते व तेरा प्रभागांमधून 43 उमेदवार रिंगणात होते. सकाळी 8 वा. पासून तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल जाहीर होणार आहेत. बहुतेक प्रभागांमध्ये भाजप व मगो पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
13 प्रभागातून 14,271 मतदारांपैकी 10,653 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदान 74.65 टक्के झाले आहे. सर्वाधिक 81.03 टक्के मतदान शांतीनगर प्रभाग 1 मध्ये तर सर्वांत कमी 68.72 टक्के मतदान कुरतरकरनगर, सदर, काझीवाडा प्रभाग 9 मध्ये झाले आहे. ही निवडणूक पक्ष पातळीवर किंवा राजकीय पक्षाच्या चिन्हावर झालेली नसली तरी भाजपतर्फे फोंडा नागरिक समिती पॅनेलमधून 13 उमेदवार व मगो रायझिंग फोंडा पॅनेलमधून 12 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस पक्षाने 6 प्रभागांमधून समर्थक उमेदवारांना पाठिंबा दिला होता. भाजप पॅनेलचे खडपाबांध प्रभाग 7 मधून विश्वनाथ दळवी तर प्रभाग 13 मधून विद्या पुनाळेकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित तेरा प्रभागांचा निकाल आज जाहीर होणार आहे.
एकंदरित मतदानाचा कल पाहता भाजप व मगोमध्ये चुरशीची लढत झाल्याची शक्यता आहे. प्रभाग 1 मधील रॉय रवी नाईक व नंदकुमार डांगी, प्रभाग 2 मधील नगरसेवक वीरेंद्र ढवळीकर व राजेश तळावलीकर, प्रभाग 5 मधील नगराध्यक्ष रितेश नाईक व त्यांच्या विरोधात सुशांत कवळेकर व श्रवण नाईक या चुरशीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग 15 मधील माजी नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व संपदा नाईक यांच्यामध्येही चुरशीची लढत झाल्याने या निकालाबाबत सर्वांना उत्कंठा लागून राहिली आहे. प्रभाग 3, प्रभाग 8, प्रभाग 10 व प्रभाग 11 हे महिलांसाठी राखीव होते. या चारही प्रभागांमध्ये सर्व तेराही नवीन चेहरे असल्याने या निकालांबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.









