फोंडा तालुक्यात झाडे, वीजे खांब कोसळणे, छप्पर उडाल्याचा घटना नोंद सावईवेरे भागात कऱयांचा (बर्फाचे खडे) पाऊस

प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्याला काल तीव्र चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपले. लॉकडाऊन स्थितीत ‘स्टे होम’ असलेल्यामुळे नागरिकांना याची तीव्रता जाणवली नसली तरी काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याचे चित्र आहे. काल शुक्रवारी सायंकाळी 6 वा. सुमारास वादळी वाऱयासह पावसाच्या सरी अनुभवल्या. याच गडबडीत सावईवेरे भागातील युवकांनी पुष्कळ वर्षानंतर ‘कऱयाचा’ पाऊसाची मजाही लुटली. वीज खांब कोसळणे, रस्त्यावर झाडे उन्मळून पडणे, तर काही ठिकाणी छप्परे उडून गेल्याच्या एकूण 23 तक्रारी फोंडा अग्निशामक दलाने नोंद केल्या आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे काही प्रमाणात घरबंद असलेल्या नागरिकांचे हाल झाले.
कोरोनाविरूद्धच्या दीर्घ काळ चालणाऱया लढाईसाठी झुजत असताना अचानक जोरदार चक्रीवादळाने तडाखा दिला. ढगाळ वातावरणासह पावस येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. मात्र चक्री वादळाचा तडाखा नेमका कीती ठिकाणी बसला याची अजून माहिती प्राप्त झाली नसून प्रत्येकानी आपल्या ठिकाणच्या मोबाईल व्हीडीओ स्टेटस् अपलोड केले आहे. फोंडा अग्निशामक दलात 23 ठिकाणाहून तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. फोंडासह धारबांदोडा तालुक्यालाही याचा तडाखा बसला. फोंडा तालुक्यातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. ढवळी, बोरी, बेतोडा, सावईवेरे, खांडेपार, उसगांव, तिस्क, बेंडला, शिरोडय़ासह धारबांदोडय़ातील इतर भागांना या वादळाचा तडाखा बसला. त्यात अनेक घरांवर वृक्ष कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. फेंडा अग्निशामक दलाने शुक्रवार उशिरा रात्रीपर्यंत एकूण 25 तक्रारी नोंद करण्यात आल्या. 3 अग्निशामक वाहनासह एकूण 15 फायर फायटरांनी मदतकार्य केले. त्यातील 1 वाहन उसगांव भाग निर्जंतुकिरणासाठी गुंतलेले असल्याने सर्व तक्रारीसाठी वाहन कमी पडल्याच्याही घटना झाल्या. अग्नीशामक दल व वीज खात्याचे कर्मचारी रात्रभर मतदातकार्यात गुंतले होते.

सावईवेरे भागात कऱयांचा (बर्फाचे खडे) पाऊस
सावईवेरे भागात वादळी पावसात करे (बर्फाचे खडे) पडल्याचा अनुभव येथील ग्रामस्थांना अनुभवला. ज्येष्ठासह, लहान मुलांनी करे वेचून त्याचा सग्रंह केला. काहींजणानी याचे चित्रण करून मोबाईल स्टेटस् अपडेट करून कोरोनाच्या काळातही आनंदोत्सव साजरा करण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झाली.
साईनगर, तिस्क उसगांव येथील साई मंदिरच्या सभागृहाचे छप्पर उडून सभागृहाचीही हानी झाली. पाटणतळी येथे रस्त्यावर झाड कोसळले, तसेच खांडेपार चौगुलेजवळ पार्क करून ठेवलेल्या वाहनावर झाड कोसळले, खांडेपार भागात बागायतींनाही याचा फटका बसला. शिरशिरे बोरी भागातील बागायतीना फटका तसेच काही घरातील छप्परे उडून गेल्याच्या अनेक तक्रारी नोंद केल्या आहेत. वीजेचे खांब कोसळल्याने या भागात वीज पुरवठा खंडित झाला. वीज खात्यातर्फे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु होते. रस्त्यावर पडलेली झाडे हटवून अग्निशामक दलाने तातडीचे मदतकार्य केले. महामार्गावर पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला. अडचणीच्या ठिकाणी कोसळून पडलेली झाडे प्राधान्यक्रमाने हटविण्यात आली. कुंडई अग्निशामक दलही मतदकार्यात गुंतले होते.

भामई-पाळी भाग अंधारात
भामई-पाळी येथेही चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली तसेच मोठमोठय़ा गाराही पडल्या. 1987 मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. संपूर्ण गावातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने गाव अंधारात डुबला आहे. हा वीजपुरवठा आज सुरळीत होण्यास अशक्य आहे.









