प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर राज्यात रविवारपासून लागू केलेल्या कर्फ्यूचे जनतेकडून पालन व्हावे यासाठी फोंडा तालुक्यात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलेला केलेला आहे. फोंडा शहर तसेच तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून गस्त घालण्यासाठी फिरती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. वाहतूक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, वाहतूक निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी रविवारी दुपारी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक हेही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पुढील पंधरा दिवस हा कर्फ्यू लागू होणार असल्याने रविवारी सकाळी फोंडय़ात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुन्हा गर्दी उडाली. फोंडय़ातील मुख्य बाजारपेठेतील भाजी, फळ व फुलबाजार तसेच मासळी मार्केटही बंद आहे. मात्र शहरातील विविध नाक्यांवर आंबे व मासे विक्रेत्यांची रविवारी सकाळी आपली दुकाने थाटली होती. तेथे गर्दी दिसताच पोलीस त्यांना पिटाळून लावित. काही वेळात पुन्हा दुसऱया जागेत ते आपली दुकाने उघडून विक्रीला सुरुवात करीत. पोलीस व या व्यापाऱयांचा हा लपाछपिचा खेळ बराचवेळ सुरु होता. दुपारी संचारबंदी लागू होताच खरेदीसाठी आलेले लोक व व्यापारी बाजारातून पांगले. त्यानंतर सर्वत्र वातावरण सामसूम होते. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर फिरु नये. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन सर्वत्र फिरुन केले जात होते.









