बाजारपेठा बंद : औद्योगिक आस्थापने, बँका खुल्या
प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीचा वाढता प्रभाव व दबाव लक्षात घेऊन राज्य सरकारने लागू केलेल्या तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला फोंडा तालुक्यातील जनतेकडून पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फोंडा शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच तालुक्यातील इतर छोटय़ा मोठय़ा व्यापाऱयांनी आपली दुकाने व इतर व्यावसाय बंद ठेऊन लॉकडाऊन पाळले. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक तर बंदच होती. तालुक्यातील कुंडई, मडकई, बेतोडा व उसगाव या चारही औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने तेवढे सुरु होते. बँकांनी आपला व्यावहार सुरु ठेवला खरा, पण दिवसभरात फारसे ग्राहक फिरकले नाहीत.
जनतेला पूर्वसुचना देऊन तीन दिवसांचे हे लॉकडाऊन जाहीर केल्याने नागरिकांनी गुरुवारच्या दिवशीच भाजी व इतर सामानी खरेदी केले होती. शुक्रवारी सकाळी दूध विकत घेण्यासाठी घराबाहेर पडलेले काही लोक सोडल्यास फोंडा शहरात फारशा हालचाली दिसत नव्हत्या. औद्योगिक आस्थापनामधील कामगारांची वाहतूक करणाऱया वाहने तेवढी रस्त्यावर दिसत होती. अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचारी व बँक कर्मचारी सकाळी घराबाहेर पडले होते. दुपारपासून सुरु झालेला जोरदार पाऊस व तीन दिवसांची सक्तीची सुट्टी मिळाल्याने लोकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले आहे. सायंकाळी दूध केंद्रे व काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. फोंडा शहरातील मुख्य बाजारपेठ, दादा वैद्य चौक, कदंब बसस्थानक, जुने बसस्थानक या नेहमीच गजबणाऱया ठिकाणावर शुक्रवारच्या दिवशी शुकशुकाट पसरला होता. पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱया सर्व नाक्यांवर पहारा ठेवला होता. शिरोडा, माशेल, तिस्क उसगाव, म्हार्दोळ या तालुक्यातील अन्य बाजारपेठातील व्यावहारही बंद होते. काही तुरळक वाहतूक सोडल्यास दिवसभर लोकांच्या हालचाली दिसत नव्हत्या. गावागावातील नाक्यांवर असलेली दुकाने व चहाची हॉटेल्स बंद होती तर रस्तेही निर्जन होते. तीन दिवसांच्या या लॉकडाऊनला फोंडा तालुक्यात पहिल्या दिवशी जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.









