फोंडाघाट ‘सीसीसी’ची जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी : 90 खोल्यांचे वसतीगृह केले उपलब्ध
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाचे संकट अखंड मानवजातीवरील संकट आहे. या संकटकाळात अनेक व्यक्ती व संस्था, समाजासाठी चांगले काम करत आहेत. असेच चांगले कार्य उभारले आहे ते फोंडाघाट येथील ब्राह्मणेश्वर शैक्षणिक, सामाजिक उन्नती मंडळाने. या मंडळाने फोंडाघाट येथील त्यांचे कृषी महाविद्यालयाचे वसतीगृह कोविड केअर सेंटरसाठी (सी.सी.सी.) प्रशासनास उपलब्ध करून दिले आहे. या वसतीगृहातील 90 खोल्या संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक नामदेव मराठे यांनी या केंद्रासाठी दिल्या आहेत. या ठिकाणी राहणाऱया नागरिकांनाही सर्व सुविधांचा पुरवठा करत आहेत. या केंद्राला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्वतः भेट दिली आणि संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार आदी उपस्थित होते.
या संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यापूर्वी तिथे अलगीकरण कक्ष उभारण्यात आला होता. या अलगीकरण कक्षामध्ये एकावेळी 119 नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली होती, अशी माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.
या ठिकाणी अलगीकरण कक्ष असताना तेथील नागरिकांचे जेवणही या वसतीगृहाच्या मेसमधून पुरवण्यात येत होते. उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांच्या पुढाकाराने या वसतीगृहातील 90 खोल्या संस्थेचे अध्यक्ष नामदेव मराठे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
समाजाचे आपण काही देणे लागतो, अशी भावना उराशी बाळगून मंडळाने केलेले काम हे खरेच खूप चांगले आहे. अशाप्रकारचे कार्य सर्वच तालुक्मयांमध्ये उभे राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक नामदेव मराठे यांच्या या कार्यात त्यांच्या मंडळाचे पदाधिकारी दीपेश मराठे, सुचिता मराठे, विद्या राणे-पाटील, जनार्दन देसाई, प्रशांत पाटील यांनीही मोलाची साथ दिली आहे. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातूनही संस्थांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुढाकार घेवून कोविड केअर सेंटर (सी.सी.सी.) उभारण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.









