फोंडय़ातील सिनेमागृहाबाहेरील स्टॅन्डवर पोस्टर कधी झकळणार
प्रतिनिधी / फोंडा
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून मनोरंजनाची स्थळे बंद होती. राज्य सरकारतर्फे कोरोनाची लाट ओसरतीकडे असताना नियमात शिथीलता देण्यात आलेली आहे. राज्यात सर्वत्र मनोरंजनाची कवाडे खुलू लागली असताना मात्र फोंडा शहरात असलेले एकमेव सिनेमागृह अजून खुले होत नसल्याची चिन्हे दिसत असल्यामुळे सिने रसिक हिमरमुसले आहेत.
बॉक्स ऑफिसवर सद्या धूम घालत असलेला काश्मिरमधील सन 1990 सालच्या काश्मिर पंडीतावर बेतलेला चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ राज्यात करमुक्त करण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला आहे. मात्र या चित्रपटाचा शो बघण्यासाठी फोंडय़ातील चित्रपटप्रेमींना वीस किलोमिटर लांब असलेल्या मडगांव किंवा पणजी गाठावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असून चित्रपटप्रेमींची वाढती मागणी बघता फोंडय़ातील एकमेव सिनेमागृह खुली करण्यात यावे अशी मागणी सिने रसिकांनी केलेली आहे.
पणजी येथील कला अकादमीच्या दुरूस्ती कामामुळे बहुतेक कार्यक्रम व नाटय़ स्पर्धा फोंडय़ातील राजीव गांधी कला मंदिरमध्ये घेण्यात येत असल्यामुळे तात्पुरते मनोरंजन होत आहे. फोंडय़ातील सिने रसिक जे शुक्रवारी ‘फस्ट डे फस्ट शो’ पाहणाऱयासाठी आतुरलेले असतात त्यांना सिनेमागृह कधी खुले होणार याची ताटकळत वाट बघत रहावे लागले आहे. सिनेमागृहाबाहेरील स्टॅन्डवर चित्रपटाचे पोस्टर कधी झळकणार याची आतुरतेने वाट बघत आहे.









