स्वदेशी पब्जी गेमचे चाहते सुखावणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशी पब्जी मानला जाणारा ऑनलाईन गेम फॉगच्या अधिकृत सादरीकरणाचे वृत्त वाचून लाखो मोबाईलगेम चाहत्यांना आनंदाचे उधाण येणार आहे. रॉयल बॅटल गेम ऍप फॉग भारतात 26 जानेवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती त्याच्या विकासकांनी दिली आहे. देशभक्तीने परिपूर्ण हा गेम प्रजासत्ताक दिनी उपलब्ध होणार आहे. तर पब्जी मोबाईल इंडियाला पुन्हा मान्यता देण्याबाबत अद्याप अनिश्चिततेची स्थिती आहे.
सुमारे 4 महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने फॉग गेम (फियरलेस अँड युनायटेड : गार्ड्स) भारतात सादर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात या गेमचे प्री-रजिस्ट्रेशन गुगल प्ले स्टोअरवर सुरू होते, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या 24 तासांतच लाखो लोकांनी फॉग गेमसाठी नोंदणी केली होती. परंतु 2020 मध्ये फॉग गेमची प्रतीक्षा संपुष्टात आली नव्हती. 26 जानेवारी रोजी हा गेम उपलब्ध होणार असल्याने चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.
कसे असणार स्वरुप
बेंगळूर येथील एनकोर गेम्स डेव्हलपर्सनी फॉग गेमच्या सादरीकरणाच्या तारखेची घोषणा केली आहे. आगामी 26 जानेवारी रोजी या बहुप्रतीक्षित गेम ऍपला सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. सादरीकरणानंतर अँड्रॉईड वापरकर्ते हा गेम प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतील. तर ऍपल ऍप स्टोअरवर फॉग गेम कधी अपलोड करण्यात येणार याविषयी माहिती प्राप्त झालेली नाही. फॉग गेममध्ये भारत-चीन सीमेला लागून असलेल्या गलवान खोऱयाची प्रचिती येणार आहे. तेथे वापरकर्ते स्क्वॉडचा हिस्सा होऊन शत्रूला धडा शिकवू शकतील आणि सीमेची सुरक्षा करू शकतील.
पब्जीबाबत अनिश्चितता
भारतात पब्जी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. याचमुळे याचे विकासक भारतात पब्जी मोबाईल इंडिया ही देशी आवृत्ती सादर करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु अद्याप त्यांना सरकारकडून मंजुरी मिळू शकलेली नाही. भारतात सध्यातरी पब्जी मोबाईल इंडियाला सादर करण्याची मंजुरी मिळाली नसल्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.









