प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील फिश मार्केटसमोर पंजाब-भटींडा येथील एक व्यक्ती रस्त्याशेजारी आढळली. त्या व्यक्तीला फेसबुक प्रेंड्स सर्कलतर्फे निवारा केंद्रात भर्ती करण्यात आले. डीसीपी रविंद्र गडादी व फेसबुक प्रेंड्स सर्कलच्या मदतीने त्या व्यक्तीला भटींडा येथे पाठविण्यात आले. पोलीस व युवकांच्या मदतीमुळे तो वृद्ध आपल्या गावी पोहोचू शकला.
फेसबुक प्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांना फिश मार्केट रोडवर एक निराधार व्यक्ती सापडली. भटींडा येथील परमिंदर सिंग नामक या व्यक्तीला श्रीराम सेना हिंदुस्थानच्या रुग्णवाहिकेने खासबाग येथील निवारा केंद्रात सोडण्यात आले. श्रीराम सेनेच्या भरत नागरोळी, अमर कोलकार, संदेश जुवेकर यांची मदत मिळाली.
रविवारी डीसीपी रविंद गडादी यांच्या मदतीमुळे परमिंदर यांना निजामुद्दीन रेल्वेने त्यांच्या घरी पाठविण्यात आले. यामध्ये खासबाग येथील सरकारी निवारा केंद्राचे शंकर बी. एम., डॉ. रोहित जोशी, गणपत पाटील, प्रमोद शर्मा, अवधुत तुडवेकर, प्रमोद शर्मा, पृथ्वीराज श्रेयेकर यांच्या मदतीमुळे ती व्यक्ती गावी जाऊ शकली.
दोन बेघरांची निवारा केंद्रात सोय
शहरातील दोन बेघर वृद्धांना फेसबुक प्रेंड्स सर्कलच्या मदतीने निवारा केंद्रात सोडण्यात आले. किर्लोस्कर रोड येथे दिव्यांग असणारा एक व्यक्ती फुटपाथवर झोपला होता. याचबरोबर आणखी एक व्यक्ती कपिलेश्वर मंदिरनजीक बेवारसस्थितीत होती. या दोन्ही वृद्धांना खासबाग येथील निवारा केंद्रात सोडण्यात आले. यासाठी पोलिसांचेही सहकार्य मिळाले.









